शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये जागावाटपावरून काडीमोड होण्याची चिन्हे असताना महायुतीतील घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आमच्याही जागा घेऊन तुमची भूक भागत असेल, तर तसा प्रस्ताव द्यावा, असे उद्वेगजनक वक्तव्य सोमवारी केले. याआधीही राजू शेट्टी यांनी महायुती टिकवण्यासाठी छोट्या घटक पक्षांच्या जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतरही अद्याप जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये एकमत झालेले नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यासारख्या छोट्या पक्षांची अडचण झाली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनीही सोमवारी वृत्तवाहिनीशो बोलताना हे स्पष्ट केले. ते म्हणाले, महायुती अखंड राहावी, असे आमचे मत आहे. मात्र, दोन मोठ्या पक्षांच्या वादामध्ये घटक पक्षांची फरफट होते आहे. आमचे उमेदवार नविन आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी वेळ हवा आहे. त्याग करण्याची आमची परंपरा आहे. सगळ्याच जागा घेऊन भूक भागत असेल, तर तसा प्रस्ताव द्यावा, असेही राजू शेट्टी म्हणाले.