विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून शिवसेना व भाजप या दोन प्रमुख पक्षांमधीलच वाद विकोपाला गेल्यामुळे महायुतीतील लहान पक्षांचे हेलकावे सुरू झाले आहेत. युती तुटलीच तर, राज्यसभेची खासदारकी देणाऱ्या भाजपबरोबर रहायचे की, शिवशक्ती-भीमशक्तीची पाठराखण करण्यासाठी शिवसेनेला साथ द्यायची, अशी कोंडी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची झाली आहे.
विधानसभेच्या कुणी किती जागा लढवायच्या यावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम या लहान पक्षांसमोर पेच निर्माण झाला आहे.  लहान पक्षांना जवळ करण्याचे प्रयत्नही सेना-भाजपचे सुरू आहेत. गेल्या महिन्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आठवले यांना दिल्लीत बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात जरा अस्वस्थता पसरली होती. तर मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी आठवले यांना मातोश्रीवर बोलावून, त्यांचा कल जाणून घेतल्याचे समजते. या भेटीनंतर मात्र युती तुटलीच तर, शिवशक्ती-भीमशक्तीची पाठराखण करायची, की खासदारकी संभाळायची असा पेच आठवले यांच्यासमोर निर्माण झाल्याचे सांगितले जाते.