संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा; अशोक सराफ यांना ‘कलागौरव’ प्रदान
अर्चना नेवरकर फाऊंडेशनतर्फे गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात ‘डोंट वरी बी हॅपी’ हे नाटक, ‘कटय़ार काळजात घुसली’ हा चित्रपट आणि ‘अस्सं सासर सुरेख बाई’ही मालिका सवरेत्कृष्ट ठरली. या पुरस्कार सोहळ्यात ‘नाम’ फाऊंडेशनसाठी १ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘कलागौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्कृती कलादर्पणच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सराफ म्हणाले, माझ्या ४५ वर्षांच्या अभिनय प्रवासात मला रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
यंदाच्या वर्षांपासून नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीन विभागांसाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे यंदा १६ वे वर्ष होते. नाटक विभागात सवरेत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत विभागासाठी ‘तिन्ही सांज’ला पुरस्कार मिळाले. ‘ऑल दे बेस्ट-२’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिस मॅच’, ‘शेवग्याच्या शेंगा’या नाटकांना प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले. चित्रपट विभागात ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शक, छायांकन, गीतरचना, पाश्र्वगायन, संवाद, दिग्दर्शन आणि सवरेत्कृष्ट चित्रपट असे नऊ पुरस्कार मिळाले. या चित्रपटातील ‘खॉंसाहेब’ भूमिकेसाठी अभिनेते सचिन पिळगावकर यांना ‘मानाचा मुजरा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘नटसम्राट’ चित्रपटातील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ‘विशेष परीक्षक’ तर नाना पाटेकर यांना ‘अभिनय सम्राट’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मालिका विभागात तितिक्षा तावडे (सवरेत्कृष्ट पदार्पण), मृणाल दुसानीस (सवरेत्कृष्ट अभिनेत्री), वैभव चिंचाळकर (सवरेत्कृष्ट दिग्दर्शक), अभिनेता स्वप्निल जोशी (फेस ऑफ द इअर), मानसी नाईक (स्टाईल आयकॉन) यांना तसेच वृत्तवाहिनी विभागात जयंत पवार (पत्रकारिता), एबीपी माझा (सवरेत्कृष्ट वृत्तवाहिनी), अमोल परचुरे व निलिमा कुलकर्णी (सवरेत्कृष्ट सूत्रधार) यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर यांनी केले.