नागर रंगभूमीवर लोकनाटय़, मुक्तनाटय़ रुजविणारे बिनीचे शिलेदार असलेले ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भालेकर यांचे आज शनिवारी पहाटे ३.२० वाजता बॉम्बे रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र व अभिनेता हेमंत भालेकर, पाच मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शाहीर साबळे आणि पार्टीची अनेक लोकनाटय़े सुहास भालेकर आणि राजा मयेकर या जोडगोळीने गाजवली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ावरचे ‘आंधळं दळतंय’ हे लोकनाटय़ तुफान लोकप्रिय ठरले. त्याचप्रमाणे ‘कशी काय वाट चुकलात’, ‘कोंडू हवालदार’, ‘माकडाला चढली भांग’, विजय तेंडुलकरलिखित ‘फुटपायरीचा सम्राट’, सई परांजपेलिखित व दिग्दर्शित ‘एक तमाशा सुंदरसा’ अशी त्यांची अनेक नाटके गाजली.
शाहीर साबळे आणि पार्टीच्या लोकनाटय़ांचे दिग्दर्शन सुहास भालेकर करीत असत. जर्मन नाटककार बटरेल्ड ब्रेख्त यांनी लिहिलेल्या ‘द कॉकेशियन चॉक सर्कल’ या मूळ जर्मन नाटकावर आधारित ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक चि. त्र्यं. खानोलकरांनी लिहिले होते. विजया मेहता दिग्दर्शित या नाटकातील सुहास भालेकर यांची भूमिका मराठी रसिकप्रेक्षकांबरोबरच जर्मन रसिकांच्याही पसंतीस उतरली होती.
सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांतर्गत ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक जर्मन दिग्दर्शक फ्रिट्स बेनेविट्झ यांच्या सहकार्याने बसवून विजया मेहता यांनी जर्मनीतही या मराठी नाटकाचे प्रयोग केले होते. त्यापूर्वी भालेकरांनी साहित्य संघाच्या ‘एकच प्याला’मध्ये तळीराम साकारला होता. ‘झुंज’, चि. त्र्यं. खानोलकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘चानी’, ‘सुशीला’, ‘लक्ष्मी’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या होत्या. महेश भट यांच्या ‘सारांश’, ‘अर्थ’ या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या होत्या. जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर आधारित ‘चक्र’, ‘शक’, ‘गहराई’ इत्यादी हिंदी चित्रपटांतही त्यांनी आपला ठसा उमटविला.
मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबरीवर आधारित ‘भाकरी आणि फूल’ आणि अलीकडे ‘असंभव’मधील सोपानकाका अशा दूरचित्रवाणी मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या.

Story img Loader