‘आगे आगे देखिए होता है क्या’, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान आणि भ्रष्ट नेत्यांच्या अटकेची किरीट सोमय्या यांनी केलेली मागणी या पाश्र्वभूमीवर, या सरकारकडून कधी जेलमध्ये टाकले जाते याची आम्हीही वाट पाहात आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली. भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत बुधवारी ‘योग्य वेळी बोलेन,’ अशी सावध प्रतिक्रिया देणारे पवार यांनी भुजबळ यांची पाठराखण करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीवरही गुरुवारी जाहीर नाराजी व्यक्त केली. पवार यांच्या या विधानांमागे अजितदादांवरील संभाव्य कारवाईची किनार असल्याचे मानले जाते.
भुजबळ यांनी गुरुवारी सकाळी पवार यांची भेट घेऊन सारी वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या भेटीनंतर पवार यांनी भाजप सरकार आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला लक्ष्य केले. एरवी संयमाने परिस्थिती हाताळणारे पवार यांनी एकदम टोकाची भूमिका का घेतली असावी, याची चर्चा सुरू झाली.
आकसाने कारवाई सुरू आहे या भुजबळ यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असे सांगताना पवार यांनी आपणही गृह खाते भूषविले असल्याने या खात्याची कार्यपद्धती चांगलीच अवगत असल्याचे स्पष्ट केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उच्चपदस्थांना तपासापेक्षा प्रसार माध्यमांमध्ये जाण्याची घाई झालेली दिसते. भुजबळ यांच्या निवासी सदनिकेची चुकीची माहिती देण्यात आली. तपास यंत्रणेने काळजीपूर्वक तपास करून त्यानुसार पुढे जाणे अपेक्षित असते. आपण चौकशीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बांधकाम खात्यातील निर्णय हे एकटय़ा भुजबळ यांनी घेतले नव्हते तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतले होते. भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्यास पक्ष त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहील. मालमत्तेची किंमत दरवर्षी वाढत जाते. त्यासाठी भुजबळ यांच्या नाशिकच्या मालमत्तेचे उदाहरण देता येईल. पूर्वी ही जमीन शहराच्या बाहेर होती व आती ती शहराच्या मध्यभागी आली आहे. मालमत्तेच्या संदर्भात अतिरंजित माहिती दिली जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला. प्रसार माध्यमांना माहिती देण्यामागे कोणाचा तरी काही तरी हेतू दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही पवार यांनी केली.
पवार दिल्लीत वजन वापरणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शरद पवार यांचे उत्तम संबंध असले तरी मुख्यमंत्री फडणवीस मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात कारवाईसाठी आग्रही आहेत. फडणवीस यांनी फारच कठोर भूमिका घेतल्यास पवार हे दिल्लीत आपले वजन वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षाच्या नेत्यांवर कारवाई होऊ नये यासाठी पवार यांचा प्रयत्न राहणार आहे.
‘सूडबुध्दीने काम ही आमची प्रथा नाही’
लातूर : सूडबुध्दीने काम करण्याची आमची प्रथा नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाराजीला उत्तर देताना केला. महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेली कारवाई पूर्णपणे व्यक्तिनिरपेक्ष असून ती उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे ते म्हणाले.