गेल्याच आठवडय़ात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार हे विजयी झाले असले तरी त्या निवडणुकीत डी. वाय. पाटील स्टेडियमवरील सामने हा प्रचाराचा मुख्य मुद्दा होता, तसेच पाटील यांच्या पुत्राने पवार यांना आव्हान दिले होते. आठवडाभरानंतर त्याच डी. वाय. पाटील यांच्या विद्यापीठाने पवार यांना शुक्रवारी डी. लिट. पदवी देऊन गौरविले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शरद पवार यांना पुण्यात झालेल्या समारंभात डी. लिट. ही पदवी बहाल करण्यात आली. पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठाने (अभिमत विद्यापीठ) पवार यांच्यासह राष्ट्रपती पुत्र तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल हा गौरव करण्यात आला. डी. वाय. विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केल्याबद्दल पवार यांनी या विद्यापीठाचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.  गेल्या आठवडय़ात झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवार यांच्या विरोधात डी. वाय. पाटील यांचे पुत्र विजय यांनी निवडणूक लढविली होती. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आयपीएल अथवा आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास पवार यांचा विरोध असल्याचे चित्र प्रचारात उभे करण्यात आले होते.आता त्याच डी. वाय. पाटील यांच्या विद्यापीठाने पवार यांचा गौरव केला.

Story img Loader