शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली आहे. याबैठकीला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखसुद्धा असणार आहेत.
उध्दव ठाकरेंनी बोलावलेली ही बैठक म्हणजे जागावाटपाच्या मतभेदांवरून भाजप-शिवसेनेतील दरी आणखी रुंदावल्याची चिन्हे आहेत. या बैठकीत विधानसभेसाठी भाजपसोबत युती करायची की नाही, यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे समजते. दरम्यान, मंगळवारी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची ‘मातोश्री’वर उध्दव यांच्यासोबत जागावाटपाच्या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच मराठवाड्यातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही ‘मातोश्री’वर घेण्यात आल्या आहेत.