मेधा पाटकर यांचे मत
दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भारताने अवलंबवलेला मार्ग हिंसाचाराचा असून त्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. गांधीजींनी देशासाठी अनेक सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने केले. तोच अहिंसेचा मार्ग त्यांनी आपल्यालाही दाखवला. त्यामुळे देशात जो काही हिंसाचार व युद्ध होत आहेत. बदला घेतला जात आहे तो योग्य नव्हे, असे वक्तव्य मेधा पाटकर यांनी केले.
गांधी जयंतीनिमित्त आणि त्यांनी केलेल्या चंपारण सत्याग्रह शताब्दी वर्षांनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात ‘चंपारण सत्याग्रहाने देशाला काय दिले?’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटकर यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना हे मत व्यक्त केले. चंपारण सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने परिसंवादाबरोबरच जयंत दिवाण यांनी लिहीलेल्या ‘कहाणी चंपारण सत्याग्रहाची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामजी सिंह, डॉ. रत्नाकर महाजन, कॉ. अजित अभ्यंकर आणि मेधा पाटकर उपस्थित होते. या समारंभात डॉ. रामजी सिंह यांनी चंपारण सत्याग्रहाची माहिती देऊन गांधीजींच्या विचारांना उजाळा दिला. तर डॉ. रत्नाकर महाजन यांनी गांधीजींबद्दलची आजची भावना स्पष्ट केली. आज गांधीजी आणि त्यांच्या विचारांना न मानणारे किंवा त्यांच्यावर हसणारे वा त्यांची खिल्ली उडवणारे लोक असले, तरी शेवटी या सर्व मंडळीना गांधीजींचे नाव घेतल्यावाचून राहता येणार नाही, असे डॉ. महाजन म्हणाले.