संगीतकारांचेही गाण्यासाठी पाश्र्वगायन
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची संकल्पना असलेले आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेले ‘हे गजवदन’ गाणे संगीतातील एक वेगळा प्रयोग ठरणार आहे. आरती प्रभू यांनी ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकासाठी लिहिलेल्या नांदीच्या ओळी आणि ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ अशा दोन गाण्यांना एकत्र गुंफून ‘हे गजवदन वक्रतुंड महाकाय’ हे गाणे तयार झाले आहे. या गाण्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे शास्त्रीय व भावसंगीतातील विविध दिग्गज या गाण्यासाठी एकत्र आले असून काही संगीतकारांनीही या गाण्यासाठी पाश्र्वगायन केले आहे.
हे गाणे ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात आले असून त्याची निर्मिती मोहित भिशिकर यांनी केली असून दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. गाण्यात पियानो, गिटार, सतार, सरोद, पखवाज, मृदुंग, ड्रम, कथ्थक नृत्यासाठी म्हटली जाणारी ‘पंढत’सुद्धा यात आहे. सौरभ भालेराव व हृषीकेश दातार यांनी संगीतसंयोजन केले आहे.
ज्येष्ठ पाश्र्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे, सावनी शेंडे, मंजूषा पाटील, अनुराधा कुबेर तर भावसंगीत व चित्रपट संगीत क्षेत्रातील अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, वैशाली सामंत, केतकी माटेगावकर, कवी संदीप खरे, विभावरी आपटे, मधुरा दातार, हृषीकेश रानडे, आनंदी जोशी ही मंडळीही आहेत. कौशल इनामदार, मिलिंद इंगळे, नीलेश मोहरिर, मिथिलेश पाटणकर, मिलिंद जोशी या संगीतकारांनीही गाण्यासाठी पाश्र्वगायन केले आहे. तसेच रेकॉर्डिस्ट प्रमोद चांदोरकर, विजय दयाळ, नितीन जोशी, अवधूत वाडकर यांनीही या गाण्याला आवाज दिला आहे.