ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे आज निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  दीर्घ आजाराने मुंबईत त्यांचे निधन झाले. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल  हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबई गाठलेली. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

मूत्रपिंडाच्या त्रासामुळे तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ जुलै रोजी सकाळी १० ते १०.३० दरम्यान त्यांचे पार्थिव माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

प्रा. मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्‌स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातून मायबाप प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने ५००० प्रयोगांची यशस्वी घौडदौड केलेली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करायचे. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले.

त्यांनी धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. त्याशिवाय, २० पुस्तके लिहिली आहेत. ‘उत्तरमामायण’ या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे मामांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.