जग पुरुषी वर्चस्वाच्या प्रभावाखाली आहे, हा केवळ महिलांचाच अनुभव नाही, तर ते विकीपिडिया या जगातल्या सर्वाधिक लोकशाहीवादी वेबसाइटचेही निरीक्षण आहे. आणि म्हणूनच ही दरी आपल्यापरीने भरून काढण्यासाठी विकीपिडियाने यंदाच्या जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ‘विमेन्स हिस्ट्री मंथ’ आणि ‘एडिट-अ-थॉन’ हे दोन अभिनव उपक्रम आयोजित केले आहेत.
ज्ञान आणि माहितीची मुक्त देवाणघेवाण हीच बांधीलकी मानणाऱ्या विकिमिडिया फाऊंडेशनला असे आढळून आले आहे की संपूर्ण जगभरातून विकीपिडियावर माहिती जमा तसेच संपादित करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ९० टक्के तर स्त्रियांचे प्रमाण जेमतेम १० टक्के आहे. तसेच स्त्रियांशी संबंधित विविध विषय, प्रश्न, पैलू यांच्याबाबतच्या माहितीचे प्रमाणही विकीपिडियावर तुलनेत अत्यंत कमी आहे. या संदर्भात विकिमिडिया फाऊंडेशनच्या विश्वस्त बिशाखा दत्ता ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाल्या की, ही परिस्थिती बदलायची असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील, असे आमच्या लक्षात आले आणि त्यामुळेच आम्ही यंदा ८ मार्चला जगभर ‘एडिट अ थॉन’ आयोजित केले आहे.
८ मार्चपासून विकीपिडियावर ‘विमेन्स हिस्ट्री मंथ’सुद्धा साजरा केला जाणार आहे. ‘एडिट अ थॉन’ हा त्याचाच एक भाग आहे. या महिनाभरात इंग्रजी तसेच इतर सर्व भाषांमधून विविध कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रे, स्त्रियांशी संबंधित विषय, त्यांचे पैलू, स्त्रियांचे प्रश्न या सगळ्या माहितीची विकिपिडियावर भर घातली जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमामध्ये भाग घेऊन ८ मार्च वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन विकिमिडिया फाऊंडेशनच्या इंडिया चॅप्टरच्या सदस्य रोहिणी लक्षणे यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या माहितीसंबंधीचे Wikipedia:Meetup/International Women’s Day, India  हे वेबपेजही विकीपिडियाने प्रसिद्ध केले आहे.

एडिट-ए- थॉन म्हणजे काय?
‘एडिट- ए- थॉन’च्या कालखंडात खूप मोठय़ा प्रमाणावर मजकूर लिहून, संपादित करून अपलोड केला जातो. मात्र इथली संपादनाची प्रक्रिया इतर ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेपेक्षा वेगळी असते. यामध्ये मजकुरातील तपशील खात्रीलायक पद्धतीने तपासले जातात. म्हणजेच एखाद्या लेखकाची जन्मतारीख, जन्मगाव यांचा उल्लेख असेल तर त्याची खातरजमा करणारा पुरावा किंवा संदर्भ सोबत असावा लागतो. त्या शिवाय खात्रीशीर माहिती म्हणून त्याचा वापर केला जात नाही. अशा प्रकारचे संपादनाचे काम काहीसे जिकिरीचे असते. जगभरात लाखोंच्या संख्येने असलेले स्वयंसेवक हे काम एकाही पैशाची बिदागी न घेता अव्याहतपणे विकीपीडियासाठी करत असतात.

Story img Loader