‘मराठी भाषेत ज्ञानकोश असला पाहिजे’, अशा महत्त्वाकांक्षेने झपाटून हे प्रचंड काम एकहाती पूर्ण करणाऱ्या डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘ज्ञानकोशा’चे सर्वच्या सर्व म्हणजे २३ खंड आता माहितीच्या महाजालावर आले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुढाकाराने हा प्रकल्प पूर्ण झाला असून हे खंड माहितीच्या महाजालात आणण्याचे तांत्रिक काम पूजा सॉफ्टवेअरने केले आहे. ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’चे हे सर्व खंड http://ketkardnyankosh.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
लोकमान्य टिळक यांनीही डॉ. केतकर यांना, ‘हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही’, असा सल्ला दिला होता. पण केतकर यांनी सर्व आव्हाने आणि संकटांचा सामना करत १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण केला. १९१७ मध्ये सुरू केलेले काम १९२८ मध्ये संपले. मराठी भाषेतील ‘ज्ञानकोशा’चा पाया घालण्याचे काम केतकर यांनी या निमित्ताने केले.
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे हे २३ खंड मराठीतील पहिला ज्ञानकोश आहे. ज्ञानाचा खजिना मराठी भाषेत कोशाच्या स्वरूपात उलगडला गेला त्याला आता नव्वद वर्षे उलटून गेली. उगवत्या पिढय़ांसाठी मराठी भाषेतील हा खजिना जपून ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वाची आहे. हे दुर्मिळ साहित्य आणि मराठी ज्ञान यांची जपणूक व्हावी आणि त्यासाठी जमेल ते करावे, असे प्रतिष्ठानचे धोरण आहे आणि त्यातूनच मराठीतील हा पहिला ज्ञानकोश इंटरनेटवर नेण्यात आल्याची भूमिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी इंटरनेटवरील या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट करताना संकेतस्थळावर मांडली आहे.
‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’चे पहिले पाच खंड हे प्रस्तावना स्वरूपाचे असून यात अनुक्रमे हिंदुस्थान आणि जग, वेदविद्या, बुद्धपूर्व जग, बुद्धोत्तर जग आणि विज्ञानेइतिहास यांचा समावेश आहे. खंड ६ ते २१ यात अकारविल्हे माहिती देण्यात आली आहे. खंड २२ हा सूची खंड तर खंड २३ हा पुरवणी खंड असून हे सर्व खंड इंटरनेटवर उपलब्ध असल्याची माहिती ‘पूजा सॉफ्टवेअर’चे माधव शिरवळकर यांनी दिली. सर्व २३ खंडांची मिळून साडेबारा हजार पाने संकेतस्थळावर असून या कामात प्रतिष्ठानचे सरचिटणीस आणि माजी सनदी अधिकारी शरद काळे यांचेही मोलाचे सहकार्य आणि योगदान असल्याचे शिरवळकर म्हणाले.