उपराजधानीत नववर्षांच्या मुहूर्तावर दुचाकीहून चारचाकी वाहनांची जास्त विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे. दोन्ही कार्यालयात या दिवशी तब्बल दीडशेवर वाहनांची नोंदणी झाली. यात सात ई-रिक्षांचा समावेश आहे, हे विशेष.
[jwplayer sHk0lrGQ]
शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांवर असून विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागासह शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगडसह इतर राज्यातून शिक्षण, काम, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामासाठी येथे नागरिक येतात. शहराची लोकसंख्या प्रत्येक वर्षी वाढत असून त्यानुसार शहरातील दुचाकीसह चारचाकी वाहनांचीही संख्या वाढत चालली आहे. शहराची औद्योगिक प्रगती बघता येथे रोजगाराच्या संधी वाढत असल्याने ग्रामीणसह इतर भागातून नागरिकांचे स्थलांतरही वाढले आहे. शहरात सध्या दुचाकी वाहनांची संख्या साडेअकरा लाखांच्या जवळपास असून चारचाकी वाहनांची संख्याही सव्वा लाखाहून जास्त आहे. ही संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे.
शहरात प्रत्येक वर्षी नववर्षांच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री नोंदवली जात असून यंदा विक्रीचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. त्यातच शहरात दरवर्षी चारचाकी वाहनाच्या तुलनेत दुप्पट वा त्याहून जास्त दुचाकी वाहनांची विक्री परिवहन कार्यालयात केली जाते. यंदाच्या वर्षीच्या नोंदीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून नववर्षांरंभी तब्बल दीडशेच्या जवळपास वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात दुचाकीच्या तुलनेत चारचाकी वाहनांची संख्या जास्त आहे. या कालावधीत नागपूरच्या शहर कार्यालयांत पंचवीसहून जास्त वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे.
शहरातील दोन्ही कार्यालयातील एकंदरीत स्थिती बघता दुचाकीच्या तुलनेत शहरात चारचाकी वाहनांच्या विक्रीची नोंद प्रथमच दोन्ही कार्यालयात असल्याचे पुढे आले आहे. येत्या काही दिवसांत या नोंदीत वाढ होण्याची आशा परिवहन विभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत.
सात ‘ई-रिक्षा’ विक्रीचीही नोंद
शहरात नववर्षांच्या निमित्ताने प्राथमिक स्वरूपात दीडशे वाहनांची विक्री प्रादेशिक परिवहन कार्यालयांत नोंदवली गेली असली तरी ही नोंद येत्या दिवसात संबंधित शोरूममधून वाढण्याची आशा आहे. नोंदीत प्रथमच दुचाकीहून चारचाकी वाहन जास्त नोंदवले असून पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत सात ई-रिक्षांची नोंद झाली आहे. ई-रिक्षाची नोंद बघता या वाहनांच्या नोंदणीकडे सामान्यांचा कल वाढत असल्याची सकारात्मक बाब पुढे आली आहे.
– रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर
मुहूर्तावर ३५ हून जास्त वाहनांच्या विक्रीची नोंद
वाहनात पिकअप वाहन, स्कूलबस, ट्रॅक्टरसह इतर वाहनांचा समावेश आहे, तर या कालावधीत शहर कार्यालयात ३५ हून जास्त चारचाकी वाहनांची विक्री झाल्याची नोंद असून केवळ २० च्या जवळपास दुचाकी वाहनांची विक्री नोंदवण्यात आली आहे. पूर्व नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांत १० पिकअप व्हॅन, सात ‘ई-रिक्षा’, १२ टॅक्सी, ५ ऑटोरिक्षासह २७ दुचाकी, २ जेसीबीची नोंद करण्यात आली आहे, तर दुचाकी वाहनेही सुमारे १५ च्या जवळपास नोंदवण्यात आली आहेत.
[jwplayer atTxpXOQ]