महेश बोकडे

राज्यात करोनासह ‘सारी’चे रुग्ण वाढत असतांनाच त्यात ‘स्वाइन फ्लू’ची (एच १ एन १ विषाणू) भर पडली आहे. १ जानेवारी ते १६ एप्रिल २०२० पर्यंत राज्यात ‘स्वाइन फ्लू’चे १०९ रुग्ण आढळले असून यापैकी निम्मे रुग्ण २८ फेब्रुवारीनंतरचे आहेत. विशेष म्हणजे, आजाराची लक्षणे दिसल्यानंतर करोनाची चाचणी नकारात्मक आलेल्यांपैकी काही रुग्णांना ‘स्वाइन फ्लू’ची बाधा झाल्याचे आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

सर्वाधिक करोनाग्रस्त मुंबईत असतानाच ‘स्वाइन फ्लू’चेही सर्वाधिक रुग्ण मुंबईतच नोंदवले जात आहेत. पुण्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, मुंबईत १ जानेवारी ते १६ एप्रिल २०२० पर्यंत या आजाराचे ५२ रुग्ण आढळले. ठाणे विभागात सहा, पुणे विभाग १६, कोल्हापूर विभाग- तीन, नाशिक विभाग १८, औरंगाबाद विभाग- सात, लातूर विभाग- दोन, नागपूर विभागात पाच असे एकूण राज्यात १०९ रुग्ण नोंदवले गेले. यापैकी ५५ रुग्ण हे २८ फेब्रुवारीनंतरचे आहेत. यातही मुंबईतील रुग्णांची संख्या (२९) सर्वाधिक आहेत. स्वाइन फ्लूमुळे बीड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांत मार्च महिन्यात तीन मृत्यूंची नोंदही झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यातील शासकीय व खासगी प्रयोगशाळेत रोज मोठय़ा संख्येने  हजारो नमुने तपासले जात आहेत. यातील शासकीय प्रयोगशाळेत ९४ टक्के तर खासगी प्रयोगशाळेत ९६ टक्के व्यक्तींचे अहवाल नकारात्मक येत आहे. त्यातील काहींचा स्वाइन फ्लू अहवाल सकारात्मक आढळू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून तातडीने परिमंडळ स्तरावर इन्फ्ल्युएंझा संशोधन समिती स्थापन केली असून त्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह विविध खासगी डॉक्टरांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक- २ डॉ. अर्चना पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आरोग्य विभागाच्या अन्य एका अधिकाऱ्याने स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

करोना संशयिताचा पहिला तपासणी अहवाल नकारात्मक आल्यावर दुसऱ्या तपासणीत त्याला स्वाइन फ्लू असल्याची बरीच उदाहरणे समोर आली आहेत. राज्यात २० मार्चपर्यंत ९९ स्वाइन फ्लूग्रस्त आढळले. त्यामुळे शासनाने ७ एप्रिल २०२०ला विभागनिहाय इन्फ्ल्युएंझा संशोधन समिती गठित केली. त्यात माझ्यासह इतरही काहींचा समावेश झाला. परंतु काही तासांत ही समिती रद्द करत केवळ शासकीय अधिकाऱ्यांची समिती गठित झाली. – डॉ. अनुप मरार, समन्वयक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन, नागपूर