नागपूर : वाहतूक पोलीस दलात लाचखोरी वाढली असून अनेक पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी घोळका करून वाहनचालकांकडून वसुली करीत असल्याचे समोर आले आहे. अजनी वाहतूक परीमंडळाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने परिचारिका असलेल्या महिलेला चालान बनविण्याचा धाक दाखवून शंभर रुपयांची लाच घेतली. हा सर्व प्रकार तुकडोजी चौकात घडला असून या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर चांगलीच प्रसारित झाली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन वाहतूक कर्मचाऱ्याला निलंबित केले. किशोर दोरखंडे असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी वाहतूक शाखेचा कर्मचारी किशोर दोरखंडे हा मंगळवारी सकाळीच तुकडोजी चौकात कर्तव्यावर हजर होता. त्यादरम्यान मेडिकल रुग्णलयातील दोन परिचारिकांना किशोर यांनी पकडले. हेल्मेट नसल्याचे सांगून ५०० रुपये दंडाची पावती तयार करण्याची धमकी दिली. त्यांनी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगून सोडण्याची विनंती केली. मात्र, त्याने दंडाची पावती न तयार करण्याच्या ऐवजी दोनशे रुपयांची लाच मागितली. परिचारिकेने २०० रुपये नसल्याचे सांगताच त्याने १०० रुपये देण्यास सांगितले. एका परिचारिकेने किशोर यांना १०० रुपये दिले आणि सुटका करवून घेतली.

हेही वाचा >>> वर्धा : दत्ता मेघेंकडे भाजप नेते; भोजनासाठी राजकीय मेन्यू, बैठकीत नेमके काय शिजले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, हा सर्व प्रकार तुकडोजी चौकातील एका युवकाने भ्रमणध्वनीत कैद केला. ती चित्रफित लगेच प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली. ही चित्रफित पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी शहानिशा करून वाहतूक कर्मचारी किशोर दोरखंडे याला निलंबित केले. ‘शहरात रोख चालन घेण्यात येत नाही. थेट ऑनलाईन चालन केल्या जाते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चालानची भीती दाखवून पैसे मागितल्यास वरिष्ठांकडे तक्रारी करा’ असे आवाहन पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी केले.