गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील नागरिक सध्या सूरजागड लोहखाणीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहे. मंगळवारी प्रकल्पातील भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी जवळपास १० ट्रक पेटवून दिले. अनेक वाहनांची तोडफोड केली. तीन वर्षांपूर्वी एटापल्ली-आलापल्ली मार्गावरसुद्धा असाच प्रकार घडला होता. तरीही प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याने नागरिकांच्या जिवापेक्षा लोहखनिज महत्त्वाचे आहे काय, जडवाहतूक आणखी किती जीव घेणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वीच या भागातील व्यापाऱ्यांनी सूरजागड लोहखाणीतून कच्चा माल घेऊन जाणाऱ्या शेकडो अवजड वाहनांच्या वाहतुकी विरोधात आंदोलन केले होते. तीन दिवस बाजारपेठा बंद होत्या. आलापल्ली ते आष्टी मार्गाचे नवीनीकरण करा, नंतरच लोहखनिजाची वाहतूक करा, अशी मागणी आंदोलकांनी प्रामुख्याने केली होती. मात्र, प्रशासनाने ती मागणी धुडकावून लावली. कंपनीचे नुकसान होईल, असे एका अधिकाऱ्याने म्हटले होते. त्यामुळे व्यापारी व याभागातील नागरिक चांगलेच दुखावले गेले. प्रशासनाला लोकांच्या जिवापेक्षा कंपनीचे हित महत्त्वाचे आहे, असेच यावरून दिसून येते. प्रशासनाच्या या कंपनीधार्जिण्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोष खदखदत होता. तोच असंतोष काल अपघातानंतर झालेल्या जाळपोळीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपूर कराराची होळी

जनभावनेचा उद्रेक होण्याची शक्यता

तीन वर्षांपूर्वी देखील एटापल्ली – आलापल्ली मार्गावरील गुरुपल्ली गावानजीक अशाच एका भरधाव ट्रकने बसला धडक दिली होती. त्यात ४ लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यानंतर सुद्धा अशाचप्रकारे लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला होता. तेव्हाही जवळपास ११ अवजड वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. समस्या आणि मागणी त्यावेळीही हीच होती. त्यातून बोध घेऊन प्रशासनाने नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासन त्याकडे डोळेझाक करून पुन्हा-पुन्हा तीच चूक करत आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. प्रशासनाने वेळीच सामंजस्याची भूमिका घेत यावर तोडगा न काढल्यास भविष्यात जनभावनेचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.