५० पैसे किलो दराने शेतकरी हवालदिल

नोटाबंदीच्या निर्णयापासून मातीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला नवीन वर्षांतही उभारी मिळू शकली नाही. पतसंस्था,बँका आदींचे कर्ज घेऊन मोठय़ा मुश्किलने विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोला ५० पैसे किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. घोटी बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढली असून अपेक्षित भाव मात्र मिळत नाही. विक्रीसाठी आणलेल्या मालाला ग्राहक नसल्याने बाजार समितीत टोमॅटो फेकून देण्याचे प्रकार घडत आहेत.

मागील दीड महिन्यांपासून टोमॅटोची अवस्था बिकट झाली आहे. नोटाबंदीनंतर गिरणारे व पिंपळनारे बाजारात व्यापाऱ्यांनी जुन्या नोटा माथी मारत ३० ते ४० रुपये जाळी या दराने टोमॅटोची खरेदी केली होती. ही जाळी २० किलोची असते. निश्चलनीकरणाच्या निर्णयाआधी याच जाळीचा भाव १२० ते १५० रुपयांच्या दरम्यान होता. नवीन वर्षांत टोमॅटो उत्पादकांसमोरील संकटाची तीव्रता कमी झालेली नाही. उलट तिचा अधिकाधिक फटका त्यांना बसत असल्याचे चित्र आहे. घोटी बाजार समितीत टोमॅटोला सध्या मिळालेले भाव हे त्याचे उदाहरण. इगतपुरी तालुक्यातील धरणांमुळे मोठय़ा प्रमाणात बागायती पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. या वर्षीही शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडी बियाणे, औषधे, खते, घेऊन टोमॅटो लागवड केली होती. जानेवारीच्या सुरुवातीपासून टोमॅटोची आवक वाढली आहे. घोटी बाजार समितीत टोमॅटोला अल्प भाव मिळत असल्याने तसेच काही टोमॅटोला ग्राहकच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव शेतीमाल फेकून देण्याची वेळ आली आहे.

टोमॅटो लागवडीपासून ते विक्रीपर्यंत एका जाळीला शंभर रुपयाहून अधिक खर्च येत असून त्या तुलनेत टोमॅटोच्या एका जाळीला अवघा दहा ते वीस रुपये भाव मिळतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या भावातून वाहतूक खर्चही भरून निघत नसल्याने त्रस्तावलेले शेतकरी टोमॅटो बाजार समिती आवारात फेकून देत असल्याचे पाहावयास मिळते.

बाजार समितीत टोमॅटोचा खच

अत्यल्प भावामुळे टोमॅटो फेकून दिले जात असल्याने घोटी बाजार समितीच्या आवारात त्यांचा खच पडला आहे. त्यात स्वच्छता कामगाराअभावी समिती आवारात मोठय़ा प्रमाणात कचरा, घाणीचे आणि फेकून दिलेल्या टोमॅटोचे ढीग साचत आहे, तसेच हे टोमॅटो सडत असल्याने दरुगधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Story img Loader