राजेपद मिळण्यापूर्वी खेडय़ात राहणाऱ्या, अशिक्षित गोपाळने आपल्या कुशाग्र बुद्धीने केवळ सहा वर्षांत पुस्तकी शिक्षणाबरोबर अनेक गोष्टी आत्मसात केल्या. पुढे आपल्या कारकीर्दीत चोख प्रशासनाबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही अनेक कलांचे संवर्धन महाराजा सयाजीरावांनी केले. त्यांचे वय १८ वष्रे झाल्यावर त्यांचा विवाह तंजावरचे सरदार मोहिते यांची कन्या लक्ष्मीबाई उर्फ चिमणाबाई प्रथम हिच्याशी झाला.
त्या काळात संस्थानिकांकडे असलेले दरबारी नर्तक, कवी, संगीतकार, कलाकार हे त्या संस्थानिकाचे भूषण समजले जाई. काही ठिकाणी विवाहप्रसंगी देण्याच्या हुंडय़ामध्ये नर्तक, गायक, यांचाही समावेश होता. चिमणाबाई (प्रथम) स्वत भरतनाटय़म् आणि कर्नाटक संगीतामध्ये जाणकार होती. लग्नानंतर चिमणाबाईने आपल्याबरोबर नर्तक गायकांचा एक संच बडोद्याला आणला. त्यात नटवनर अप्पास्वामी आणि त्याची पत्नी कांतिमती हे प्रमुख होते. अप्पास्वामीच्या मृत्यूनंतर कांतीमती आणि तिचा मुलगा कुबेरनाथ हे बडोदा सोडून दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात गेले होते. परंतु राजे प्रतापसिंगांच्या आग्रहावरून बडोद्यातील कलाभवन पॅलेसमध्ये संगीत शिक्षक म्हणून परत आले.
पुढे कुबेरनाथ तांजोरकरांनी त्यांचा मुलगा रमेश तांजोरकर याच्याबरोबर स्वतची तांजोर डान्स म्युझिक अँड आर्ट रिसर्च सेंटर ही कलाशिक्षणाची संस्था स्थापन केली. सयाजीरावांनी बडोद्यात कलेचे शिक्षण देण्यासाठी कलाभवन ही संस्था सुरू केली. या संस्थेत त्यांनी चित्रकला, शिल्पकला, रंगकाम, विणकाम इत्यादी विषयांचे वर्ग सुरू केले. पुढे या संस्थेत भारतीय संगीत, भरतनाटय़म्, वाद्यवादन यांचेही शिक्षण सुरू झाले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com
कुतूहल – पिंजण विभागातील यंत्रे- भाग ४
गाठ उकलक यंत्राने कापूस उचलून पुढे पाठविल्यानंतर त्यावर सौम्य स्वच्छक यंत्राद्वारे प्रक्रिया करण्यात येते. िपजण विभागातील स्वच्छक यंत्राची रचना अगदी सोपी असते. या यंत्राच्या रचनेत तीन प्रमुख घटकांचा समावेश असतो. प्रत्येक यंत्रात एक भरवणी घटक असतो.
या भरवणी घटकामध्ये एकमेकावर दाब देऊन बसविलेले दोन रूळ किंवा वरचा भरवणी रूळ आणि त्या खाली भरवणी पाटी किंवा वरचा भरवणी रूळ आणि खालील पाटीऐवजी भरवणी पट्टय़ा यांच्या स्वरूपात असते.
यानंतर दुसरे म्हणजे प्रत्येक यंत्रात एक आघातक बसविलेला असतो. हा आघातक सर्वसाधारणपणे वृत्तचितीच्या आकाराचा असून या वृत्तचितीच्या पृष्ठभागावर कापसावर आघात करणारे घटक बसविलेले असतात. उदा. पोकळ किंवा भरीव दांडे, खिळे, करवती दाते, जड पाती इत्यादी.
यंत्राचा तिसरा घटक म्हणजे कापसाची स्वच्छता करणारा म्हणजे आघाताच्या प्रक्रियेनंतर कापसातील सुटा झालेला कचरा कापसापासून वेगळा करणारी यंत्रणा.
या यंत्रणेमध्ये प्रामुख्याने आघातकाच्या खालील बाजूस आघातकाच्या परिघाशी समांतर असे एकमेकांत थोडे अंतर ठेवून बसविलेले दांडे येतात. या रचनेला दांडय़ाची जाळी असे म्हणतात.
स्वच्छक यंत्रामध्ये केल्या जाणाऱ्या प्रक्रियेची तीव्रता ही त्या यंत्रामध्ये कोणत्या प्रकारची भरवणी यंत्रणा व कोणत्या प्रकारचा आघातक वापरण्यात आला आहे यावर अवलंबून असते. उदा. दोन रुळांची भरवणी यंत्रणा सौम्य प्रकारची प्रक्रिया करते तर रूळ व भरवणी पाटी किंवा भरवणी दांडय़ांची भरवणी यंत्रणा तीव्र प्रक्रियेसाठी वापरली जाते.
आघातकाच्या आघाताची तीव्रता ही आघातकाचे वजन आणि त्याची फिरण्याची गती यावर अवलंबून असते. जर आघातक पोकळ व वजनाने कमी असेल आणि त्याची फिरण्याची गती जर कमी असेल तर त्याच्यामुळे कापसावर होणारा आघात हा कमी तीव्रतेचा असतो आणि या उलट जर आघातक भरीव आणि वजनाने अधिक असेल आणि त्याची फिरण्याची गती ही अधिक असेल तर कापसावर होणारा आघात हा अत्यंत तीव्र असतो.
आघातकाच्या पृष्ठभागावर बसवलेले आघात करणारे घटकसुद्धा प्रक्रियेच्या तीव्रतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. या घटकांचा आकार जर पोकळ दांडय़ासारखा असून या दांडय़ांची संख्या जर कमी असेल तर आघातकाची क्रिया सौम्य होते आणि हे घटक जर भरीव असतील आणि त्यांची संख्यादेखील जास्त असेल तर आघातकाची क्रिया अधिक तीव्रतेची असते.
चं. द. काणे (इचलकरंजी) ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org