मुंबईत आकाशवाणी केंद्र सुरू झाले ते १९३८ साली. या केंद्रावर आज दिसतात, ते सर्व कार्यक्रम अगदी पहिल्या दिवसापासून साहजिकच सुरू  झाले नाहीत. पण कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या सर्जनशीलतेतून शास्त्रीय, सुगम, सिने-नाटय़संगीत, नभोनाटय़े, श्रुतिका, मुलाखती, क्रीडा, भाषणे,  मुलांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम, बातम्या असे नाना प्रकार विकसित होत गेले.
मानव गेल्या आठ-दहा हजार वर्षांपासून शेती करीत आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या मनाप्रमाणे शेती करीत आला. हळूहळू पुढच्या पिढीतील लोक आपले पूर्वज ज्या पद्धतीने शेती करीत त्याचा कित्ता गिरवू लागले. पुढे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर दुष्काळ, अतिवृष्टी, वादळे, गारपीट, टोळधाड, तांबेरा, चिकटा वगरेसारखे रोग अशी संकटे ओढवू लागली, तसतसा तो प्रयोग करून या संकटांना तोंड देऊ लागला. पुढे शेतकी महाविद्यालये आणि शेतकी विद्यापीठे निघाली. तेथे संशोधन सुरू झाले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला. पण आकाशवाणी केंद्र सुरू झाल्यावर काही वर्षांनी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम करणे सुरू झाले, तेव्हापासून एकाच वेळी अनेक लोकांना त्याचा फायदा होऊ लागला.
आकाशवाणीवर प्रत्येक हंगामात कोणती पिके घ्यायची, त्यासाठी कोणते बियाणे योग्य, कोणती खते, कोणत्या जमिनीसाठी, किती प्रमाणात वापरायची, त्यासाठी जमिनीचे परीक्षण कसे करून घ्यायचे, पिकांची मशागत कशी करायची, कोणत्या पिकांवर कोणते रोग पडतात, ते आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजायचे, नवनवीन बियाण्यांची माहिती, नवीन संशोधनांची माहिती, ठिबक सिंचन, पाणी साठविण्यासाठी शेततळे कसे बनवायचे, धान्य कसे साठवायचे, बाजारभाव अशा एक ना अनेक विषयांवरची माहिती  आकाशवाणी- मार्फत शेतकऱ्यांना मिळते. शिवाय प्रत्येक हंगामातील हवामानाचा, पाऊस पाण्याचा अंदाज, अतिवृष्टी किंवा तत्सम टोकाच्या हवामानात शेतीची काळजी कशी घ्यायची, असे सर्व प्रकारचे मार्गदर्शन आकाशवाणी ‘कृषिवाणी’ कार्यक्रमाद्वारे करते.
अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होतो. १९७०च्या दशकात हरित क्रांतीच्या काळात शेतकऱ्यांनी तांदळाच्या एका जातीला चक्क ‘रेडिओ राइस’ असे नाव दिले होते.

वॉर अँड पीस: पोटोबा मोठोबा? आयुर्वेदीय उपचार
विविध वर्तमानपत्रांत मध्यमवयीन स्त्री-पुरुष ‘मेजरिंग टेप’ने आपल्या पोटाचा आकार मोजत आहेत, अशा जाहिराती व लेख नित्य वाचनात येतात. कोणा डॉक्टर-वैद्य वा स्पेशालिस्टकडे गेले की ती ज्ञानी मंडळी ‘काटा तोडू नका’ असा प्रेमळ सल्ला देऊन वजन बघतात. कोलेस्टेरोल, ट्रायग्लिसराईड, मधुमेह इत्यादींचा मागोवा घेतात. पथ्यापथ्याचे सल्ले देतात. रुग्ण काही काळ ऐकतात. नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. या विषयासंबंधात आयुर्वेदीय थोर ग्रंथात वात, पित्त, कफ यांच्या विविध प्रकारांचे संस्कार आपल्या खाण्या-पिण्यावर कसे होतात याचे खूप मार्मिक विवेचन केले आहे.
१) वायूच्या पाच प्रकारांपैकी अपानवायू गुदस्थानी राहात असून, कुल्ले, बस्ती, शिस्न व मांडय़ा या स्थानात संचार करतो व शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ यांना बाहेर काढतो. २) समानवायू पाचकाग्नीजवळ राहून सर्व कोठय़ांत संचार करतो. अन्नाचे ग्रहण व पचन  करतो व त्याचा सत्त्वांश मलापासून पृथक करून मलाचे विसर्जन करतो. पित्ताच्या पाच प्रकारांपैकी पाचकपित्त पक्वाशय व आमाशय यांच्या मध्यभागी राहात असून व पंचभूतात्मक असूनही अग्नीचा अंश अधिक असल्यामुळे द्रवत्व त्याग करून पचनादी क्रियेच्या योगाने अग्निसंज्ञा मिळविते, अन्न पचविते, त्यातील सत्त्वांशाचे मलापासून पृथक्करण करते व स्वस्थानीच राहून इतर पित्तांना बलदायक होते. ४) जे पित्त आमांशयात राहून रसाला रंगविते, त्याला रंजक पित्त म्हणतात.  ५) कफाच्या पाच प्रकारांपैकी जो कफ आमांशयात राहून अन्नसंघाताला पातळ करतो त्याला क्लेदक कफ म्हणतात. ६) जो कफ जिव्हेत राहून रसज्ञान उत्पन्न करतो त्याला बोधक कफ म्हणतात.    सायंकाळचे जेवण लवकर, निम्मे, गरम पाण्याबरोबर,  ज्वारी, मूग, उकडलेल्या बिनमिठाच्या भाज्या असे असावे. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा प्र.३, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ प्र.६, रसायनचूर्ण १ चमचा दोन वेळा, आम्लपित्त टॅब्लेट जेवणानंतर ३, झोपण्यापूर्वी गंधर्वहरितकीचूर्ण १ चमचा. पुरेसा व्यायाम व फिरण्याचे महत्त्व सर्वानाच माहिती आहेच.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      तंत्रज्ञान आणि युद्ध  
स्पेस ओडेसी नावाचा एक विलक्षण चित्रपट येऊन गेला. त्यात माकड आणि मानव यांचा स्थित्यंतरामधल्या प्राण्यांच्या दृश्याने सुरुवात होते. अंधार पडतो तसे हे प्राणी एका निमुळत्या गुहेत शिरतात. चंद्र उगवतो तसे इतर प्राणी यांना मारून खाण्यासाठी जमा होतात. असे अनेक दिवस चालते. जीव मुठीत धरून हे जगतात. एका रात्री त्यातला एक माकडमानव एक लाकडाचे फळकूट उचलतो. गुहेच्या समोर गुरगुरत बसलेल्या वाघाच्या श्रीमुखात मारतो, वाघ घाबरतो, काहीतरी भलतेच घडले आहे हे जाणतो आणि इतर हिंस्र श्वापदांबरोबर पळ काढतो, असे दृश्य दाखवले आहे. माणूस जातीच्या पूर्वजाने आत्मसात केलेले हे पहिले तंत्रज्ञान. पुढे माणूस स्वत:ला वाचवण्यासाठी घर बांधण्याचे तंत्रज्ञान अमलात आणतोच, परंतु इतर माणसांबरोबर लढण्यासाठी हत्यारांचे तंत्र विकसित करतो. बूमराँग येथे धनुष्यबाण, सुरे, तलवारी, भाले अशी उत्क्रांती होते. रथ येतात. मग मोटारी येतात आणि रणगाडे, बंदुका, तोफा आधीच्याच असतात. त्या या गाडय़ांवर बसवतात, मग विमाने येतात, जहाजे तर असतातच त्यावरूनही मग विमाने उडू लागतात. पाणबुडय़ा आधीच आलेल्या असतात. त्यातून स्फोटके असलेली आयुधे सोडण्याची व्यवस्था करतात. बरोबरीने हवेत उडणारी रॉकेट्स येतात. अणुबॉम्ब निर्माण झालेला असतो. तो या रॉकेटवर बसवता येतो आणि प्रतिपक्षाची अशी रॉकेट्स उडाली की ती पोहोचायच्या आधीच आकाशातच खल्लास करण्याची प्रतिरॉकेट्स तयार होतात. या सगळ्या गोष्टींना अचूकपणे उडवण्यासाठी, त्यांचा मार्ग बदलण्यासाठी संगणक वापरला जातो. कोणीतरी अमेरिकेत बसलेली असते. तिला  तालिबानच्या छावण्यांचा ठिकाणाचा पत्ता गुप्तहेर उपग्रहाद्वारे कळवतो. ती एक कळ दाबून अरबी समुद्रातल्या जहाजाला ही माहिती कळवते. तिथून किडय़ाच्या आकाराचे एक मानवरहित यान जहाजावरून उडते ते घूघू असा स्वत:शीच आवाज करत त्या अतिरेक्यांच्या तळावर घोंघावते आणि अग्निबाणाने त्यांना खतम करते. आकाशात घिरटय़ा घालणारे उपग्रह तो खात्मा टिपतो. तो अमेरिकेत बसलेल्या ‘तिला’ संदेश पाठवतो. ‘स्वारी सफल’.
स्पेस ओडेसी चित्रपटातल्या माकडमानवांच्या दृश्यानंतर दहा हजार वर्षांनंतरचा काळ दाखवला आहे. माणसे चंद्रावर वस्तीला आहेत. तिथून एक ग्रहावर दूरवर जाण्याचा हुकूम निघतो. तीन माणसे आणि दोन संगणक हे प्रवासी. त्यातला एक संगणकच माणसांविरुद्ध बंड करतो, दोघांना मारतोही. एक वाचतो, तो संगणकाला मारतो आणि यान ग्रहावर उतरवतो. तिथे सगळी घरे रिकामी असतात. एकाच घरात एक माणूस असतो. तो या प्रवाशांची एक अति म्हातारी प्रतिकृती असते. ती म्हणते काय मिळवलंस शेवटी? स्वत:कडेच परतलास?
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २८ ऑक्टोबर
१८८१ >  लेखक, अनुवादक देवीदास भास्कर लेले यांचा जन्म. डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्या पुस्तकाचा ‘मुमुक्षुमार्ग’ हा अनुवाद, जे. कृष्णमूर्ती यांच्या पुस्तकाचा अनुवाद तसेच ‘सानंदाचे साम्राज्य व इतर प्रवचने’ ही त्यांची पुस्तके होत.
१८९० >  ज्ञानेश्वरीचे अभ्यासक दत्तात्रेय व्यंकटेश केतकर यांचा जन्म. ‘जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी’, ‘जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)’ , ‘ज्ञानेश्वर- ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ’ ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. केतकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले.
१८९३ >  कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचा जन्म. रविकिरणमंडळातील ते एक प्रमुख कवी होते.
‘बालगीत’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह, तर कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे नंतर प्रकाशित झालेले संग्रह. त्यांच्या आणि कवी यशवंतांच्या कवितांचे एकत्रित ‘वीणाझंकार’ व ‘यशोगौरी’ हे संग्रह आहेत.  ‘पोर खाटेवर मृत्युच्याच दारा’ ही गाजलेली  कविता  गिरीश यांचीच. ‘मराठी नाटय़छटा’, माधव ज्यूलिअन यांचा ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांचे ‘ख्रिस्ताय’ या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले होते.
संजय वझरेकर