खेचण साच्यामधून बाहेर पडणारा पेळू हा सूत बनविण्यासाठी योग्य प्रकारे तयार झालेला असतो. आता या पुढे या पेळूची जाडी कमी करून त्याला पीळ दिला की सूत तयार होते. पेळूची जाडी ही त्यापासून तयार करावयाच्या सुताच्या जाडीपेक्षा २०० ते ५०० पटीने अधिक असते. त्यामुळे सूत बनविण्यासाठी अंतिम खेचण साच्यामधून बाहेर पडणाऱ्या पेळूची जाडी  ही २०० ते ५०० पटीने कमी करणे गरजेचे असते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जाडी कमी करणे एकाच टप्प्यात शक्य नसते म्हणून ती दोन टप्प्यांत केली जाते. पहिला टप्पा हा वात साचा हा होय आणि दुसरा किंवा शेवटचा टप्पा हा बांगडी साचा हा होय. वात साच्याला गिरणीमध्ये भिंगरी साचा असेही संबोधले जाते.
पूर्वीच्या काळी जेव्हा वात साच्याची पेळू बारीक करण्याची क्षमता कमी होती त्या वेळी एकामागोमाग एक असे तीन वात साचे वापरले जात असत. त्यांना प्राथमिक साचा (स्लबर फ्रेम), अंतरिम साचा (इंटरमिडिएट फ्रेम) आणि अंतिम किंवा वात साचा (रोविंग फ्रेम) असे म्हणत असत. वात साच्यातील आधुनिकीकरणामुळे आज वात साच्याची खेचण क्षमता वाढली आहे त्यामुळे आज एकच वात साचा वापरला जातो आणि त्याला वात साचा, पंखाच्या चात्याचा साचा किंवा गती साचा असे म्हटले जाते. या साच्यावर पेळूची जाडी सुमारे ८ ते १४ पटीने काम केली जाते.
अंतिम खेचण साच्यातून बाहेर पडणारा पेळू डब्यामध्ये भरून ते डबे वात साच्याच्या मागे ठेवून वात साच्याला पुरविला जातो. हा पेळू पुढे खेचण रुळांमधून पाठवून, या रुळांच्या साहाय्याने त्याची जाडी ८ ते १४ पटीने कमी केली जाते. जाडी कमी केल्यानंतर त्या पेळूला वात असे म्हणतात. या वातीची जाडी इतकी कमी असते की तिची ताकद अगदी कमी असते. म्हणून तिला थोडासा पीळ देऊन ती बॉबिनवर गुंडाळावी लागते. हा पीळ देण्यासाठी आणि वात बॉबिनवर गुंडाळण्यासाठी पंखाच्या चात्याचा वापर केला जातो. या यंत्रावर तयार होणाऱ्या बॉबिनला वातीची बॉबिन असे म्हणतात.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – धर्मेद्रसिंह यांचे कुशासन
गुजरातमधील राजकोट येथील जडेजांचे राज्य १८०७  मध्ये कंपनी सरकारच्या अंकित झाल्यावर आलेल्या शासकांनी राज्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विशेषत बावाजीराजसिंहजी आणि त्यांचे  पुत्र लाखाजीराजसिंहजी द्वितीय यांच्या कारकीर्दीत राजकोट हे एक वैभवसंपन्न संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
बावाजीराज यांची कारकीर्द इ.स. १८६२ ते १८९० अशी झाली. यांच्या काळात राजकोटमध्ये विविध विषयांच्या शिक्षण संस्था स्थापन होऊन ते देशातील महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विख्यात झाले. त्या काळात कॅनाट हॉल, लांग लायब्ररी, वॅटसन म्युझियम, राजकुमार कॉलेज इत्यादी प्रसिद्ध संस्था आणि त्यांच्या इमारती उभ्या राहिल्या. कृषि, शैक्षणिक, कलाविषयक नागरिकांची सल्लागार मंडळे स्थापन झाली.
परंतु या सर्व उत्कर्षांवर बोळा फिरविणारी कारकीर्द लखाजीराजचा मुलगा धर्मेद्रसिंहजी यांची झाली. ब्रिटिशांनी, खरेतर त्याच्या शिक्षणाची, संस्काराची उत्तम व्यवस्था केली; परदेशातही शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परंतु वडील आणि आजोबांविरुद्ध प्रवृत्ती असलेल्या, गुंडगिरी, खूनशी स्वभावामुळे धर्मेद्रला  ब्रिटिशांनी एक वर्षभर सत्तेपासून दूर ठेवले.
वर्षभराने सत्तेवर आल्यावर त्याने सामान्य जनतेला डोईजड होतील असे कर वाढविले. अरेरावी, कुशासनामुळे धर्मेद्रसिंहने राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आणली. अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तू स्वतच उतरत्या किमतीत घेऊन टंचाई निर्माण करून मग चढय़ा किमतीत विकू लागला. राज्याचा निम्माअधिक महसूल स्वतच्या उधळपट्टीत घालवू लागला.
धर्मेद्रच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध लोकांनी मोच्रे, संप करून निषेध व्यक्त केला. राष्ट्रीय काँग्रेसने आंदोलन उभे केले, महात्मा गांधींनी उपोषण केले. राजकोटच्या जनतेची राजाच्या छळवादातून अद्भुतरीत्या सुटका झाली! १९४० साली सासनगीरच्या जंगलात सिंहाची शिकार करताना धर्मेद्रसिंहजीचा मृत्यू झाला!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader