फळे कमी तापमानाला आणि योग्य आद्र्रतेला साठवल्यास फळांमधील जैवरासायनिक क्रियांचा वेग मंदावतो. फळांचे आयुष्य वाढते. कमी तापमानाच्या फळांच्या साठवणीला ‘शीतगृहातील साठवण’ (कोल्ड स्टोरेज) म्हणतात.
‘बाष्पीभवनाने थंडपणा’ या तत्त्वावर आधारित कमी खर्चाचा आणि कमी ऊर्जेचा शीतकक्ष (कूल चेंबर) फळांच्या साठवणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यालाच ‘शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष’ म्हणतात. स्वस्त आणि सहज उपलब्ध असणाऱ्या विटा, बांबू, वाळा आणि गोणपाट इत्यादी वस्तूंपासून तो बनवता येतो. शीतकक्षामध्ये बाहेरील वातावरणाच्या तुलनेत तापमान कमी व आद्र्रता जास्त असल्याने फळांमध्ये बाष्पीभवन कमी होऊन त्यांच्या वजनात घट येत नाही. फळांच्या श्वसनक्रियेचा वेग मंदावतो. फळातील उष्णतामान कमी होण्यास मदत होते. त्यामुळे फळे हळूहळू परंतु एकसमान पिकू लागतात. फळे व भाजीपाला ताजा, टवटवीत व आकर्षक राहतो. फळांपासून प्रक्रिया केलेले विविध पदार्थ, दूध व अंडीसुद्धा शीतकक्षात उत्तम प्रकारे साठवता येतो. शेतकरी शीतकक्ष आपल्या शेतावर स्वत: बांधू शकतो.
नियंत्रित वातावरणातील साठवण पद्धतीमध्ये कक्षातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे फळांच्या श्वसनाचा वेग मंदावतो. ती हळूहळू पिकतात व सुकत नाहीत. फळांची बुरशी व जीवाणूंमुळे होणारी नासाडी टाळली जाते व त्यांच्या वजनात येणारी घट कमी होते.
परिवर्तित वातावरणात साठवण पद्धतीत ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून कार्बनडायऑक्साईड व नायट्रोजनचे प्रमाण वाढवून फळे पॉलिथीनच्या पिशवीत हवाबंद करतात. पिशवीत हवा व पाणी शोषून घेणारे पदार्थ ठेवतात. टोमॅटो, भेंडी, काकडी, अळंबी यांच्यासाठी हे फायदेशीर आहे.
कमी दाबाच्या वातावरणात साठवण केल्यामुळे फळांना ऑक्सिजन कमी मिळतो. त्यांची श्वसनक्रिया मंदावते. फळांतील इथिलीन वायूचे उत्पादन कमी होऊन फळे पक्व  होण्याची क्रिया मंदावते. फळांचे आयुष्यमान वाढते.
गॅमा किरणांच्या प्रक्रियेमुळे फळे पिकण्याची क्रिया संथ होते. किडींचा आणि रोगजंतूंचा नाश होतो. कंदमुळे, बटाटा, रताळी, कांदे, आले, लसूण इत्यादींमध्ये कोंब फुटणे टळते. यालाच ‘कोल्ड स्टेरिलायझेशन’ म्हणतात.
– डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – भक्त
पुण्यात फग्र्युसन कॉलेजजवळ जुन्या वडारवाडीच्या आसपास सहस्रबुद्धे दत्तमंदिर आहे. वास्तू देखणीच नव्हे तर स्वच्छ आणि लोभस आहे. ह्य़ा संस्थेला परंपरा आहे. अक्कलकोटच्या स्वामींपासूनची ही परंपरा. शैव आणि वैष्णव जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले होते तेव्हा दत्तसंप्रदाय सुरू झाला त्याला स्वरूपसंप्रदायही म्हणतात. मला वाटते त्यांच्यापैकी ही मंडळी. दिवंगत दिगंबरदास महाराज सहस्रबुद्धे महाराजांचे उत्तराधिकारी. दिगंबरदास महाराजांनी प्रचंड परिश्रम आणि अपरंपार श्रद्धेच्या जोरावर ही संस्था उभी केली. चिपळूणच्या जवळ दक्षिणेला डेरवण या गावाजवळ ह्यांचे आश्रमवजा स्थान आहे. दिगंबरदास महाराजांचे उत्तराधिकारी अशोक जोशी उपाख्य काका महाराज यांनी या विभागाचा कायापालट केला आहे. परंपरा जपण्यात त्यांनी कंबर कसली आहे. इथे शिवाजीचे चरित्र सांगणारी ‘शिवसृष्टी’ त्यांनी पुतळ्याच्या साह्याने उभारली आहे. तिथे शेकडो लोक  येतात.
परंपरा जपताना यांनी आधुनिकतेचा त्याग केलेला नाही. कारण तिथेच त्यांनी एक अद्ययावत रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयाचा माझा अनेक वर्षे संबंध होता. काही वर्षे दीड-दोन महिन्यांतून एकदा आणि नंतर दीडवर्ष महिन्यातून पंधरा दिवस इथे मी काम केले. माझ्या आयुष्यात या संस्थेने मला खूप जपले आणि आनंदही दिला. हल्ली जाणे होत नाही हे मात्र तेवढेच खरे. त्या रुग्णालयाचे नाव वालावलकर रुग्णालय.
हे वालावलकर मागच्या पिढीतले एक मराठी विकासक किंवा बिल्डर. ते दिगंबर महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांचा मुलगा विकास वालावलकर त्यांनी ही परंपरा अशीच चालू ठेवली आहे. या संस्थांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे महाराजांवरची उत्कट श्रद्धा असलेले त्यांचे अनेक भक्त. त्यातले सध्याचे सगळ्यात सधन आणि तरीही नम्र आणि सतत हसतमुख आणि सढळ हाताने मदत करणारे आणि या संस्थाचे आर्थिक आधारस्तंभ म्हणजे हा विकास वालावलकर नावाचा माणूस. हे स्वत: त्यांच्या व्यवसायामुळे सधन आहेत. पण तेवढेच उदार आणि आपल्या गुरूपरंपरेच्या सतत आज्ञेत आणि त्यांच्यासाठी झटणारे. गडी ज्ञानी आहे. कारण ह्य़ा व्यवहारी जगाला ओळखून त्यात यश मिळवूनही जरा दूरच आहे. या सगळ्यात असून वागणुकीत साधा, सरळ आणि उमदा म्हणजे एका अर्थाने वैराग्यशील आणि म्हणूनच एका खास ऐश्वर्यात रुतलेला असा हा माणूस. कालच्या लेखातल्या श्रीकृष्णासारखा पण स्वत:च भक्त.
 समाजात असे अनेक असणार पण माझ्या आयुष्यात हे आले म्हणून ह्यांचे वर्णन आणि ज्या गुरूपरंपरेने अशा भक्ताला निर्माण केले त्यांनाही वंदन. कालच्या लेखातल्या श्रीकृष्णाच्या वर्णनातून हा लेख झाला.
 श्रीकृष्णाची परंपरा विष्णूकडून. त्या वैष्णवांबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – वेदनाशामक औषधे : योग्यायोग्यता!
जुनेजाणते वैद्यकीय चिकित्सक त्यातल्या त्यात सौम्य वेदनाशामक औषधे देऊन, मूळ कारणांचा मागेवा घेऊन योग्य ते उपाय, औषधयोजना करतात. काही वेळेस अल्प वेदनाशामक औषधे जादूच्या कांडीसारखी शरीरात क्रांती करत नाही. रुग्ण नाराज होतो. पण थोडा संयम पाळला तर ते अंति रुग्णाच्याच हिताचे असते.
वेदनाशामक औषधांच्या सततच्या माऱ्यामुळे तो एक अवयव तात्पुरता सुधारतो. पण इतर अवयवांची खूप खूप हानी होते. विशेषत: तीव्र डोकेदुखी, मायग्रेन, डोक्यात विलक्षण ठणका मारणे. याकरिता अ‍ॅस्परीन गटातील औषधांचा बेसुमार वापर रुग्णहिताचा नक्कीच नाही. डोकेदुखी हा स्वतंज्ञ विकार नसून ब्रेन हॅमरेज, इस्केमिया, स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांतील पूर्वसूचना असू शकते. त्यात मधुमेहाची जोड असल्यास बघायलाच नको. इथे लघुसूतशेखर, ब्राह्मीवटी, लाक्षादीगुग्गुळ, आम्लपित्तवटी, त्रिफळाचूर्णाची योजना करावी. सायटिका, फ्रोजन शोल्डर, तीव्र कंबर, गुडघेदुखी याकरिता पेनकिलर स्ट्राँग औषधे घेतल्यास मूत्रपिंडाचे कार्य काही काळाने निश्चयाने बिघडते. संडासवाटे रक्त पडणे, तोंड येणे, झोप नाहीशी होणे असे नवे रोग जडतात. इथे गोक्षुरादी, लाक्षादी, संधिवातारी, आभादि, त्रिफळागुग्गुळ, सौभाग्यसुंठ यांची पोटात घेण्याकरिता व अभ्यंगार्थ महानारायणतेलाची मदत घ्यावी.
कधी कोणाचे पोट दुखायला लागले की रुग्ण व घरचे लोक हैराण होतात. पोटाच्या इन्स्टंट औषधाने जी पोटदुखी थांबते ती पुन्हा दुप्पट वेगाने चौपट वाढते. इथे थोडा धीर धरून बेंबीत एरंडेलतेल जिरवावे. लंघन करावे. आम्लपित्तवटी, प्रवाळपंचामृत यांची योजना करावी. हातपाय खूप बधिर झाले आहेत. धड उभे राहवत नाही अशा तक्रारींकरिता चंद्रप्रभा, शृंग, सुवर्णमाक्षिकादी वटी दोन वेळा, रात्री आस्कंदचूर्ण व अभ्यंगतेलाची सकाळ-सायंकाळ मदत घ्यावी. वायसोलीन, स्टेरॉइड अशी औषधे टाळावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  ११ डिसेंबर
१९२५ > ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, ‘कोणास ठाउक कसा..’ या बालगीतांचे व ६० हून अधिक  पुस्तकांचे कर्ते राजा मंगळवेढेकर यांचा जन्म.  साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख. अनेक चरित्रे , देशोदेशींच्या गोष्टींची पुस्तके तसेच हा शोध भारताचा सारख्या पुस्तकमाला त्यांनी लिहिल्या. वसंत नारायण मंगळवेढेकर हे त्यांचे मूळ नाव, ते २००६ साली निवर्तले.
१९८७ > गुरुनाथ आबाजी (जीए) कुलकर्णी यांचे निधन. निळासावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन, काजळमाया, रमलखुण, सांजशकुन आणि पिंगळावेळ  तसेच निधनोत्तर प्रकाशित झालेले कुसुमगुंजा, आकाशफुले व सोनपावले हे कथासंग्रह, लॉर्ड ऑफ द फ्लाइज, एक अरबी कहाणी आदी ४ अनुवाद, बखर बिम्मची, मुग्धाची रंगीत गोष्ट असे बालसाहित्य, ‘माणसे : अरभाट आणि चिल्लर’ हे आत्मपर पुस्तक आणि जीएंची पत्रे (दोन खंडांत) ही त्यांची साहित्यसंपदा.
२००१ > वैदिक ग्रंथांच्या सटीप संदर्भसूचीचे पाच खंड पूर्ण करणारे रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. ‘वैदिक देवतांचे अभिनव दर्शन’ व ‘हिंदुधर्म : इतिहास आणि आशय’ हे ग्रंथ त्यांनी मराठीत लिहिले, परंतु त्यांचे अन्य ग्रंथ इंग्रजीत आहेत.
– संजय वझरेकर