या यंत्रामध्ये कापसावर केली जाणारी प्रक्रिया ही सौम्य असते. यासाठी या यंत्रामध्ये दोन रुळांच्या भरवणी यंत्रणेचा उपयोग केला जातो. सौम्य स्वच्छक यंत्रामध्ये वापरण्यात येणारा आघातक हा पोकळ व कमी वजनाचा असून त्यावरील दांडेसुद्धा पोकळ असून संख्येने कमी असतात. आघातकाची फिरण्याची गतीसुद्धा कमी असते (सुमारे ४०० ते ६०० फेरे प्रति मिनिट).
सौम्य उकलकाची प्रक्रिया फारशी तीव्र नसल्यामुळे या यंत्रात कापूस फार मोठय़ा प्रमाणावर सुटा किंवा मोकळा केला जात नसला तरी कापसातील कचरा मात्र फार मोठय़ा प्रमाणावर वेगळा केला जातो.
एखाद्या यंत्रास पुरविलेल्या कापसामध्ये जो कचरा असतो त्यापकी किती टक्के कचरा ते यंत्र काढून टाकते त्यास त्या यंत्राची स्वच्छता कार्यक्षमता असे म्हणतात. सौम्य स्वच्छक यंत्राची स्वच्छता कार्यक्षमता सुमारे २५% ते ३५% इतकी असते. खरे म्हणजे कापसात जो कचरा असतो तो, कापसाचे गठ्ठे किंवा पुंजके सल किंवा मोकळे केल्याशिवाय, सुटा होत नाही. परंतु कापसातील कचऱ्यापकी काही कचरा हा माती, वाळू, दगड, कापसाच्या बिया अशा स्वरूपात असतो. अशा प्रकारचा कचरा कापसाच्या तंतूंबरोबर गुंतत नाही. त्यामुळे कापूस थोडासा सल करून तो जोराने हलविल्यास अशा प्रकारचा कचरा खाली पडतो. हीच प्रक्रिया सौम्य स्वच्छकाच्या बाबतीत घडते आणि कचरा फार मोठय़ा प्रमाणावर वेगळा केला जातो. कापसापासून वेगळा केला गेलेला कचरा बाजूला करण्यासाठी आघातकाच्या खालील बाजूस आघातकाच्या परिघाशी समांतर अशी दांडय़ाची जाळी बसविलेली असते. त्यामधून सुटा झालेला कचरा खाली पडतो. या यंत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा खाली पडत असल्यामुळे त्या कचऱ्याला पुरेशी जागा देण्यासाठी दांडय़ाच्या जाळीचे आकारमानही मोठे असते. आघातकाच्या परिघाच्या सुमारे ६०% ते ७०% जागा ही दांडय़ाच्या जाळीने व्यापलेली असते. काही सौम्य स्वच्छक यंत्रामध्ये दोन किंवा अधिक आघातक वापरण्यात येतात. यामुळे कचरा खाली पडण्यास पुरेशी जागा मिळते. काही स्वच्छक यंत्रात वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे कापूस आघातकाच्या सभोवार दोन ते तीन वेळा फेरे घेतो. साहजिकच तो दांडय़ाच्या जाळीवरून तितक्याच वेळा जातो. याप्रमाणे कचरा खाली पडण्यास पुरेशी जागा व अवधी मिळतो.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर – सयाजीरावांचा करारीपणा
सयाजीराव (तृतीय) यांना ब्रिटिशांचे नियोजनबद्ध प्रशासन, त्यांची शिस्त याविषयी आदरभाव होता परंतु ते स्वतचा मानमरातब आणि स्वाभिमान याबाबत तडजोड करीत नसत. १९११ साली ब्रिटिश बादशाह जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारत भेटीसाठी आले होते. या भेटीनिमित्त दिल्लीच्या विस्तीर्ण मदानावर बादशाहाचा दरबार आयोजित केला होता. या दरबारासाठी महत्त्वाच्या आणि प्रथम श्रेणीच्या सर्व संस्थानिकांना खास आमंत्रणे गेली होती. ब्रिटिश दरबाराच्या शिष्टाचाराप्रमाणे पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरी सिंहासनावर विराजले होते. त्यांच्या पलीकडे व्हाइसरॉय आणि प्रांताचे गव्हर्नर, त्यांच्या पलीकडे हैदराबाद, बडोदा, म्हैसूर, जम्मू-काश्मीरचे संस्थानिक अशा महत्त्वाच्या व्यक्तींची आसनव्यवस्था होती. त्यांच्यानंतर तुलनेने कमी महत्त्वाच्या राजांची आसनव्यवस्था होती. सर्वाचे स्वागत तोफांच्या सलामीने झाल्यावर प्रथम व्हाइसरॉय आणि त्यांचे उच्चाधिकाऱ्यांनी उठून बादशाहाला व नंतर राणीला तीन वेळा वाकून मुजरे केले व पाठ न फिरवता परत आपल्या स्थानावर येऊन बसले. सर्व संस्थानिकांनी समारंभाला येताना त्यांचा शाही, दरबारी पोषाख आणि सर्व अलंकार, आभूषणे परिधान करून येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे इतर सर्व राजे आपला जामानुमा करून आले.
सयाजीरावांनी मात्र साधा पांढरा शुभ्र पोषाख आणि डोक्यावर साधे पागोटे परिधान केले होते. हैदराबाद व म्हैसूर राज्यकर्त्यांचा बादशाह व राणीला मुजरा झाल्यावर सयाजीरावांचा क्रमांक आला. त्यांनी शांतपणे उठून फक्त बादशाहाला मुजरा केला आणी बादशाहाकडे पाठ फिरवून परत आपल्या स्थानावर येऊन बसले. सयाजीरावांनी राणी मेरीकडे अजिबात न बघता, न मुजरा करता बादशाहाकडे पाठ फिरविण्यामुळे सर्व दरबार चकित होऊन गंभीर शांतता पसरली. ‘महाराजांनी शिष्टाचार न पाळून बादशाह पंचम जॉर्जचा अवमान केला’ म्हणून पुढे अनेक वृत्तपत्रात काहूर माजले होते. ना. गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या मध्यस्थीने हे वादळ शांत झाले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com