रुग्ण वॉर्डमध्ये दाखल झाल्यावर त्याच्या देखभालीची जबाबदारी नìसग स्टाफवर राहते. प्रत्येक रुग्णाचा वेगळा केसपेपर असतो. त्याला जोडून रुग्णाचे तापमानदर्शक, नाडीच्या ठोक्यांचा व श्वासाचा दर मिनिटाचा वेग आणि रक्तदाब दाखविणारे आलेख जोडलेले असतात. ठरावीक वेळाने त्याचे मोजमाप होते. डॉक्टरांच्या तपासणीची नोंद, औषधोपचाराची नोंद त्यावर असते. त्याप्रमाणे परिचारिका औषधे देते. तशी नोंद परिचारिकेच्या वहीतपण केली जाते. केसपेपरवर लाल शाईने अॅलर्जीची नोंद ठळक अक्षरात केली जाते.
परिचारिकेच्या ट्रेमध्ये इंजेक्शनच्या अँफ्युल्स असतात. त्यावरील नावे वाचणे काही वेळा दिव्यच असते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या ट्रेमध्ये एक बहिर्गोल भिंग असावे म्हणजे सर्व अक्षरे सुस्पष्टपणे वाचता येतील. चुकीच्या इंजेक्शनमुळे होणारे अपघात टाळता येतील. सलाइन चालू असल्यास त्या नळीला हात लावू नये. विशेषत लहान मुलांना अशा रुग्णांपासून लांब ठेवावे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन चालू असल्यास त्याच्या नळीला/ मास्कला हात लावू नये. या नळ्या हलल्यासारख्या वाटल्यास ताबडतोब नर्सला बोलवावे. रुग्णाने स्वत: किंवा नातेवाईकांना हात लावू देऊ नये.
प्रत्येक रुग्णालयाचे काही नियम असतात. ते रुग्णाच्या सुरक्षिततेसाठीच असतात. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनीही ते पाळावेत अशी अपेक्षा असते. त्याचप्रमाणे रुग्णसेवेसाठी काही वेळा निश्चित केलेल्या असतात. उदा. सकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान रुग्णाला उठवून दात घासायला लावणे, प्रातर्वधिी झाल्यावर स्पंजिंग करणे, सकाळी ६ ते ६.३० मध्ये चहा देणे म्हणजे रुग्णाच्या रक्तातील साखर कमी होणार नाही. न्याहरी, जेवण या सर्वाचे वेळापत्रक आखलेले असते. तसेच औषधांचे वेळापत्रकही आखलेले असते.
वॉर्डमध्ये असेपर्यंत रुग्णाला रुग्णालयातील कपडेच वापरावे लागतात, कारण त्यांचे र्निजतुकीकरण केले जाते. बाहेरून फळे आणल्यास त्यांची साले व बिया विशिष्ट डब्यातच टाकाव्यात. ही सर्व दक्षता रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी व हितासाठी पाळावयाची असते.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२
office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा..- मर्फी उवाच
मर्फीचे नियम व्यवस्थापकीय जगात लोकप्रिय आहेत कारण तिरकस शहाणपणा, नेमकेपणा आणि शब्दांच्या कोट्या त्यात भरपूर असतात. प्रत्यक्षात मर्फी नावाचे कोणी ऋषी-मुनी-गुरू आचार्य अस्तित्वात होते की नव्हते या शंकेविषयी ‘मर्फी’नेच काही नियम आणि निरीक्षणं मांडलेली आहेत.
‘मर्फी’ नावाची व्यक्ती अस्तित्वात होती का असे विचारल्यास खालील उत्तरे द्यावी.
अ) मर्फी नावाची व्यक्ती नसल्याचे सिद्ध करा.
ब) मर्फी पहिला, दुसरा असे अनेक ऐतिहासिक राजाप्रमाणे बरेच होऊन गेलेत. त्या सर्वानी एके दिवशी बसून हा घोटाळा संपविण्यासाठी ‘मर्फी’ हा किताब अनेकांना दिला, सबब अनेक मर्फी होऊन गेलेत.
क) मला कालच भेटला होता, तुझा नंबर त्याला देतो, तो फोन करेल असे आत्मविश्वासपूर्वक सांगावे.
काही निरीक्षणं..
ज्यांच्याकडे ज्ञान असतं, ते उद्योजक बनतात, कामाला लागतात.
ज्यांच्याकडे ज्ञान असतं, पण वापरता येत नाही, ते प्राध्यापक बनतात, शिकवतात.
आपल्याकडे ज्ञान असल्याचे भासवितात ते कन्सल्टंट होतात.
शॉप फ्लोअरवर मर्फी..
मशीनचा सगळ्यात नाजूक पार्ट सर्वात आधी खाली पडतो.
खाली पडलेला पार्ट घरंगळून अशा कोपऱ्यात जातो, तिथून तो काढता येणं अशक्य असतं.
टोकदार पार्ट उदा. खिळे, स्क्रू पडले की सापडत नाहीत, शोधणं सोडून दिलं की पायाला टोचतात.
शॉप फ्लोअरची सफाई करून सामान काढलं की दुसऱ्या दिवशी त्यातल्या पार्टची निवड भासते.
मशीन चालवणाऱ्या कामगारावर नजर ठेवायला सुपरवायझर नेमला की मशीन हमखास बंद पडते.
मशीन बंद पडल्यावर सगळ्यांनी सुरू करण्याचे प्रयत्न करून पाहिल्यावर मूळ मशीनबरोबर आलेल्या सूचना वाचाव्यात, त्यातली महत्त्वाची सूचना मशीन बिघडल्यावर आधी सूचना वाचाव्या. मशीन सुरू करण्यापूर्वी इलेक्ट्रिकचा स्विच ऑन करावा.
कॉम्प्युटरच्या धड चालण्यावर विश्वास टाकता येत नाही.
कॉम्प्युटर चालविणाऱ्या माणसावर
त्याहून विश्वास टाकता येत नाही.
कॉम्प्युटरमधली सिस्टम नीट चालत असल्यास ती लवकरच निकामी आणि निरुपयोगी ठरवण्यात येते.
कॉम्प्युटरमधली नवी सिस्टम अद्ययावत असते. पण ती शिकण्यास आणि राबवण्यास आधीपेक्षा वेळ लागतो आणि ती नीट चालू लागल्यावर वरचा नियम लागू पडतो.
मर्फी स्वयंपाकघरामध्ये.
ब्रेडच्या स्लाइसला लोणी लावताना स्लाइस खाली पडण्याची शक्यता अधिक असते.
लोणी लावलेली स्लाइस जमिनीवर पडल्यास, लोणी लावलेल्या साइडला पडण्याची शक्यता त्याहून अधिक असते.
जमिनीवर उत्तम कार्पेट घातलेले असल्यास लोणी लावलेल्या साइडला हमखास पडते. खाली पडलेली स्लाइस उचलायला गेल्यास आणखी काही स्लाइस खाली पडतात. लोणी लावलेल्या साइडला खात्रीने पडतात.
पाहुण्यांकरता खास जेवणात एखादा पदार्थ बाहेरून आयता मागविलेला असल्यास, पाहुणे फक्त त्याच डिशचं कौतुक करतात. त्या डिशची रेसिपी परत परत मागून घेतात.
मर्फीच्या या नियमांचा पडताळा आला नसल्यास दोन शक्यता, (१) तुम्ही जिवंत आहात ना याची खात्री करा. (२) तुम्ही खोटं बोलताहात..
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
सफर काल-पर्वाची -सम्राज्ञी थिओडोरा
पूर्वीचे आयुष्य बदलून थिओडोरा आता सन्मार्गाला लागली होती. परंतु थिओडोरा व जस्टिनियन यांच्या विवाहाला रोमन कायद्याचा अडसर होता. कायद्याप्रमाणे गुलाम अथवा रंगभूमीवर काम केलेल्या स्त्रीचा विवाह सिनेटर दर्जाचा रोमन पुरुषाबरोबर हारेऊ शकत नव्हता. तसेच महाराणी व जस्टिनियनच्या चुलतीचा याला विरोध होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर जस्टिनियनने सिनेटकडून कायद्यात बदल करून घेतला व कायद्याची संमती मिळविली. त्यानंतर लवकरच दोघांचा विवाह झाला. जस्टिनिअनने थिओडोराला सम्राट पदातील बरोबरीची भागीदार बनवून सिंहासनावर आपल्या शेजारी बसविले. राज्यकारभार करायला जे धैर्य, जो वकुब लागतो तो अत्यंत दंगलीच्या, प्रक्षोभक काळातसुद्धा थिओडोराने प्रकट केला.
राजधानी कॉन्स्टॅटीनोपलमध्ये त्या काळी ब्लू आणि ग्रीन असे दोन बंडखोरांचे गट होते. प्रथम त्यांच्यात वैमनस्य होते, पण पुढे एक झाले. त्यांनी मोठय़ा दंगली करून राज्यकारभार पूर्ण हलवून सोडला. राजवाडय़ाच्या पिछाडीला लागून असलेल्या समुद्रात बोटी तयार ठेवल्या होत्या. सम्राट व सम्राज्ञी आणि विश्वासातली काही माणसे यांनी आपल्या संपत्तीसह समुद्रमार्गे पलायन करावे, असे कौन्सिलच्या बैठकीत ठरले. फक्त थिओडोराने या निर्णयास विरोध करून अशाप्रसंगी पळून जाण्यापेक्षा बंडखोरांना खंबीरपणे तोंड देऊन त्यांच्यावरच चढाई करणे कसे आवश्यक आहे, हे तिने सांगितले. त्यामुळे प्रेरणा घेऊन जस्टिनियन व सेनापती यांनी बंडखोरांशी निकराची लढाई करून ते बंड मोडून काढले. थिओडोराचे अद्भुत बुद्धीवैभव व भाग्य यापुढे पूर्वेकडचे जग नतमस्तक झाले. ज्या कलावंतिणीने, वेश्येने असंख्य प्रेक्षकांसमोर नाटय़मंदिर कलंकित केले होते, त्या वेश्येचा सेनापती, बिशप, मॅजिस्टट्रस् वगैरेंनी सम्राज्ञी म्हणून स्वीकार केला!
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
इतिहासात आज दिनांक.. – १ डिसेंबर
१९२२ पोलंडचे अध्यक्ष जोसेफ पिलसुडस्की यांनी पदाचा राजीनामा दिला.
१९६० उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चंद्रभान गुप्ता यांची बिनविरोध निवड.
१९८८ संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, विचारवंत गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन. २ ऑक्टोबर १९०८ रोजी त्यांचा जन्म झाला. ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार संस्थानात सरदारांचे बालपण आणि शिक्षण पूर्ण झाले. शालेय शिक्षण मुंबईमधील छबिलदास हायस्कूल. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून पूर्ण केले. १९४१ ते १९६८ या काळात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. निवृत्त झाल्यावर लेखन आणि समाज प्रबोधनाला त्यांनी पाहून घेतले. याची सुरुवात त्यांच्या तारुण्यातच झाली होती. ऐन पंचविशीत स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. १९४२ च्या चळवळीत त्यांनी क्रियाशील सहभाग घेतला. गांधीवाद आणि मार्क्सवाद यांचा त्यांनी कसून अभ्यास केला. अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका, महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी, जोतीराव फुले ही पुस्तिका आणि पुढे ‘महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार’ हे पुस्तक विशेष गाजले. सर्वाधिक गाजलेला त्यांचा ग्रंथ म्हणजे ‘संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ हा होय. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर डॉ. कुमुद मेहता यांनी केले आहे. सेंट पोएटस ऑफ महाराष्ट्र, देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी असे ग्रंथाचे शीर्षक आहे. ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा, तुकाराम दर्शन, रामदास दर्शन, एकनाथ दर्शन हे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या धामधुमीत ‘महाराष्ट्र जीवन : परंपरा, प्रगती आणि समस्या खंड १, २ याचे संपादन त्यांनी केले ते मोलाचे आहे.
डॉ. गणेश राऊत
ganeshraut@solaris.in