सतत वाढत असलेल्या लोकसंख्येस पुरेसे अन्नधान्य उपलब्ध न झाल्यास कुपोषण आणि उपासमारी वाढेल. प्रत्येक नागरिकाला पुरेसा सकस आहार मिळावा, यासाठी भारत सरकारने अन्नसुरक्षा विधेयक तयार केले. ते कायद्यात रूपांतरितही झाले. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमूलाग्र बदल आवश्यक आहेत. पहिल्या हरितक्रांतीमुळे पिकांचे उत्पादन वाढले, पण त्यातील काही उपायांचे दुष्परिणाम शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अनुभवत आहेत. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सर्वाचे जीवन सुखकर करण्यासाठी खालील उपायांची रीतसर शास्त्रोक्त पद्धतीने अंमलबजावणी व्हायला हवी.
 विकसित झालेल्या शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यासाठी माहिती आणि विस्तार योजना कार्यान्वित व्हायला हवी. अन्नधान्य पिकाखालील जमीन पिकांसाठी, औद्योगिक कारणांसाठी, रस्ते आणि वसाहती तयार करण्यासाठी उपयोगात येत आहे. जैविक इंधनासाठीही अन्नधान्य पिकांचा वापर होत आहे. त्यामुळे या पिकांखालील क्षेत्रफळ कमी होत असून उत्पादकताही वाढण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा जमिनीची सुपीकता जोपासण्यासाठी आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा.
ठिबक पद्धतीने पाणी व्यवस्थापन, माती आणि पाणी बचत व संवर्धन विहिरीतील पाण्याच्या उपशावर नियंत्रण, एकात्मिक पीक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, एकात्मिक किडी आणि रोगांचे व्यवस्थापन, सुधारित पीक लागवड, सुधारित आंतरमशागतीची अवजारे, एकपीक पद्धत बदलवून मुख्य पिकात आंतर-मिश्र पिकांचा समावेश, तणांचा (तणनाशकाद्वारे) बंदोबस्त इत्यादी बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
‘उत्पादक ते ग्राहक’ या पद्धतीने थेट विक्री करणारी विक्री केंद्रे सरकारने उघडण्याचे ठरवल्यामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सुलभ आणि मजबूत होण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे निर्यातही वाढेल. यासाठी शेतीला औद्योगिकीकरणाची जोड हवी.
हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत (उदा. कमी पर्जन्यमान, अकाली पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी). त्यामुळे दुसऱ्या हरितक्रांतीमध्ये वातावरणास सहनशील असणारी पिके, सुधारित पिकांचे वाण यांवर संशोधन व्हायला हवे. दसऱ्या हरितक्रांतीमध्ये या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास पर्यावरण टिकून राहील. शेतमालाचे उत्पादन कायम राहील आणि शेतीत प्रगती होईल.
-डॉ. रूपराव गहूकर (नागपूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – खाप पंचायत
हल्ली खाप पंचायत नावाचे प्रकरण उद्भवले आहे. सगोत्र विवाह किंवा आंतरजातीय विवाह ह्य़ांच्या विरोधात खुनांच्या आणि जोडप्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येतात त्यात हरियाणा ह्य़ा प्रांताचा उल्लेख असतो आणि त्याच प्रांतात कर्नाळ जिल्ह्य़ात कुरुक्षेत्र नावाचे गाव आहे. इथेच जवळपास महाभारतातले युद्ध झाले असणार आणि त्या युद्धाबद्दल अनेक आक्षेप अर्जुन घेतो उदाहरणार्थ-
कुळामधेच वैर। मग लुप्त होतो धर्म ।
तिथ जन्मते पाप। आणि होतो कुलक्षय।।
विधिनिषेध आणि यम नियम। ह्य़ांचा होतो नाश।
मग व्यभिचार करतात। कुल स्त्रिया।।
जी समाजव्यवस्था आहे तिच्यात जर दरी पडली तर स्त्रिया सैरभैर होतील आणि त्यांना अक्षत्रियांशी संबंध किंवा लग्न करणे भाग पडेल असा ओवीचा मथितार्थ. सबंध गीतेत ह्य़ा प्रश्नाचे सरळ उत्तर श्रीकृष्ण देत नाही. ह्य़ा समाजव्यवस्थेत तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणे हा तुझा धर्म, तू नीतीच्या बाजूचा आहेस तेव्हा ह्य़ा समाजव्यवस्थेप्रमाणे तुला युद्ध अपरिहार्य आहे, असे ते समांतर उत्तर आहे. स्त्रीच्या तत्कालीन समाजातल्या स्थानाबद्दल इथे ऊहापोह होतच नाही.
क्षत्रिय वैश्य किंवा स्त्रिया। किंवा शूद्र जाति इत्यादिया ।
जाति तेव्हाच वेगळ्या वेगळ्या। जोवर नाही मला भजल्या ।।
इथे श्रीकृष्ण त्यांच्याशी किंवा परमेश्वर किंवा ब्रह्म ह्यांच्याशी सरळ संबंध जोडावा असे सांगतो आहे. अर्थात ह्य़ा ओव्या सांगणारे ज्ञानेश्वर
वेद ज्ञानाने गडगंज खरा। पण त्याच्यासारखा कृपण नाही दुसरा ।
कारण तो कानी लागला । तीनच वर्णाच्या।।
संसार दु:खात पडलेल्या। स्त्री शूद्र वगैरे जीवांना। वगळूनच हा बोलला। हेच खरे।।
मला असे वाटते की। ही त्रुटी निपटण्यासाठी। वेदच बोलले। गीता ही
ज्ञानेश्वर नावाच्या बंडखोर माणसाला प्रश्न कळतो आहे, त्यातील मेख त्यांना माहीत आहे. त्यातल्या त्यात श्रीकृष्ण नावाचा बहुजन समाजातून उदय पावलेला पुढारी सगळ्यांना जवळ करायला तयार आहे आणि ही तयारी वेदांपलीकडची आहे असे म्हणताना वेदच हे बोलत आहेत असे म्हणून त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला आहे. त्यानंतर कितीतरी पाणी वाहिले. फुले, कर्वे आणि हल्लीच्या नित्य परिचयाच्या दूरदर्शनवरच्या रमाबाई रानडे.
खाप पंचायत हे संस्कृतीचे एक विकृत स्वरूप. त्यांना बदलावेच लागेल. परंतु तरीही हा स्त्री-पुरुष प्रश्न नवनवी वळणे घेणार हे निश्चित. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस- बायपासला आयुर्वेदीय बाय बाय
गेली पाच-पंचवीस वर्षे मानवाच्या आहारात, खाण्याच्या वेळात प्रचंड बदल झाले आहेत. घरात खूप ‘गल्ला’ येऊ लागला की माणसे साधे जीवन सोडून रोजच ‘दसरा दिवाळी’ करू पाहतात. तेलकट, तूपकट, मेवा मिठाई, बेकरीचे पदार्थ, नको ती टॉनिक, व्हिटॅमिन, कॅलशियम, मांसाहार यांच्या वाढत्या वापरामुळे मधुमेह, स्थौल्य यांचे वाढते आक्रमण मानवी शरीरावर होत आहे.
रक्तवाहिनीच्या आतील स्तरावर कॅलशियम, विविध धातू, मिनरल यांचे किटण जमू लागते. रक्त वाहिनींचा आकार कमी होतो. संबंधित अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. रक्त वहन करणाऱ्या रोहिणींना फाटा फुटतो. रक्तवाहिन्यात साठलेल्या किटणामुळे त्या खडबडीत होतात. हृदयाचे काम मंद गतीने चालते. थोडय़ाशाही श्रमाने ‘फाफू’ सुरू होते. जवळच्या डॉक्टर वा रुग्णालयाकडे धाव घेतली जाते. त्या थोर तज्ज्ञांकडून बायपास सर्जरीचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियांना किमान दीड-दोन लाख रुपये आताच्या बाजारभावात असा रेट आहे. अशी बायपास शस्त्रक्रिया एकदा करूनही मूळ प्रश्न संपतच नसतो.
आयुर्वेदीय थोर थोर मान्य ग्रंथात औषधांपेक्षा पथ्यापथ्याला खूप महत्त्व दिलेले आहे. ‘संयमसे स्वास्थ्य’ म्हणजे आपला आपल्या तोंडावर, झोपेवर, खराब सवयींवर योग्य नियंत्रण हे संबंधितांना माहिती असतेच. पण एवढे असूनही ‘कळते पण वळत नाही’ अशी उदाहरणे घेऊन माझेकडे नित्य एखादा तरी हृद्रोगी येत असतो. संबंधित रुग्णाचे जीवन हे खूप धावपळीचे, वेळी अवेळी जेवणाचे वा झोपेचे व अतिशय व्यस्त असे असते. मैद्याचे पदार्थ, टिकवलेले खाद्यपदार्थ, शिळे पदार्थ पुन:पुन्हा गरम करून खाणे, मांसाहार टाळावा. हे सर्वानाच माहिती असते. पथ्यापथ्याबरोबरच आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ, आम्लपित्तवटी, रसायनचूर्ण, अभयारिष्ट, अर्जुनारिष्ट, राजकषाय, फलत्रिकादिकाढा, कुमारीआसव अशांपैकी काही औषधांची निवड करावी. वजनावर लक्ष हवेच.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  २२ नोव्हेंबर
१९०३>  चरित्रकार, पत्रकार दामोदर नरहर शिखरे यांचा जन्म. गांधीवादाच्या पुरस्कारासाठी त्यांनी ‘अग्रणी’ हे साप्ताहिक सुरू केले. गांधी जीवनकथा, गांधी-रणगीता, म. गांधी व त्यांचे सहकारी, तसेच ‘मराठीचे पंचप्राण’ ही – संतसाहित्यापासून १९५० पर्यंतच्या साहित्याची ओळख करून देणारी ग्रंथमाला त्यांनी लिहिली होती.
१९२०>  अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना। विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना॥  या गाजलेल्या कवितेसह १० खंडकाव्ये व अनेक कविता लिहिणारे कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी निधन. ‘मंदारमंजिरी’ या पुस्तकात त्यांच्या कविता संग्रहित झाल्या.
१९३३> वेणीसंहार, मालतीमाधव, मालविकाग्निमित्र, शाकुंतल, मुद्राराक्षस या संस्कृत नाटकांची मराठीत भाषांतरे करणारे महादेव लेले यांचे निधन. अकबराचे चरित्र आणि विजयनगर साम्राज्याचा इतिहास ही पुस्तकेदेखील त्यांनी इंग्रजीतून मराठीत आणली.
१९७९ > ‘मीच हे सांगितले पाहिजे’ हे मराठीतील महत्त्वाचे आत्मचरित्र लिहिणाऱ्या शीलवती केतकर (माहेरच्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन) यांचे निधन. ज्ञानकोशकार केतकरांच्या त्या पत्नी होत.
– संजय वझरेकर