आपल्या देशातील सर्व भागांत साधारणत: वर्षांतील पावसाळ्याच्या चार-साडेचार महिने पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो.
पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणीविषयी समजून घेणेही आवश्यक आहे. पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे. बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते.
पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकॉìडग आणि नॉन-रेकॉìडग अशा दोन प्रकारांत असतात.
रेकॉìडग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घडय़ाळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते. या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवडय़ाचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते.
नॉन-रेकॉìडग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्केबसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.
पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक ठेवताना, त्या ठिकाणापासून किमान ३० मीटरच्या त्रिज्येमध्ये झाड, इमारत इ. अडथळे नसावेत. सपाट प्रदेशामध्ये साधारणत: १०० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिसरात किमान एक पर्जन्यमापक असण्याची गरज आहे. हिमवर्षांव मोजण्यासाठी नॉन रेकॉìडग स्नो गेजचा वापर केला जातो.
– डॉ. दि. मा. मोरे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
तकळ्ळी शिवशंकर पिल्लै – विचारदर्शन
सन १९८४ चा ज्ञानपीठ स्वीकारताना तकळ्ली म्हणाले होते- आमची संस्कृती, आमची मुळे पश्चिमेहून खूप भिन्न आहेत. आम्ही निराळी माणसे आहोत. कथाकथनाच्या आमच्या वाटा निराळ्या आहेत. आम्ही आमचीच वाट चोखाळली पाहिजे..
‘रामायण’, ‘महाभारत’ तसेच अन्य ‘महाकाव्य’ आपण आपलंच हे तंत्र वापरून काही लिहिण्याचा प्रयत्न का करू नये? मी माझ्या ‘कॅयर’ या नव्या कादंबरीत असं करण्याचा प्रयत्न केला आहे, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. या कादंबरीत मागच्या २५० वर्षांतील केरळमधील जीवनाच्या सर्व अवस्थांचे चित्रण केलं गेलं आहे. या कादंबरीला कोणत्याही पाश्चिमात्य रूपात बघता येणार नाही. कदाचित या कादंबरीची नायिका मनुष्याची जमिनीबद्दलची भूक हीच आहे आणि ‘नायक’ आहे समाज. मी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की, यावर महाभारताचा प्रभाव आहे. त्यातील पात्रे अतिमानवी नाहीत. ते आमचे पूर्वजच आहेत. ते हे जीवन जगले आहेत. त्यांनी संघर्ष केला आणि ते मरून गेलेत. ही मानवाची कथा आहे. मी हे चित्रण आठ पिढय़ांच्या माध्यमातून केलंय.
परंपरेने मी एक शेतकरी आहे आणि आजही शेतीच करतो आहे. जर तुम्ही माझ्या पायाकडे पाहिलंत तर त्यावर साफ न करता येणारे मातीचे डाग तुम्हाला दिसतील. काही काळ मी वकिलीही केलेली आहे. माझं अभिव्यक्तीचं माध्यम ग्रामीण भाषाच आहे. गावातल्या माणसांविषयी लिहावं असा माझ्या मनात स्पष्ट विचार होता. मी जीवनावर आणि मनुष्यावर प्रेम करतो. अस्पृश्य, दलित, दुर्दैवी तसेच खालच्या स्तरातील लोकांच्या जीवनाने मला लेखनाच्या सुरुवातीच्या काळात प्रभावित केले होते. ग्रामीण भागातील सामान्य माणूस मला नेहमीच प्रिय वाटत आलेला आहे. माझ्या मते भारतीय ग्रामीण माणसाला अतिशय समृद्ध अशी परंपरा मिळालेली आहे. मी या ग्रामीण लोकांबरोबर राहिलेलो आहे. मी त्यांच्याबरोबर आनंदित झालो आणि त्यांच्याबरोबर रडलोही. मी उदास झालो, पण मी त्यांची साथ कधी सोडली नाही. मी त्यांचा मित्र होतो, पण कधी शत्रू बनलो नाही..
ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाल्यानंतर मी माझ्या साहित्यिक जीवनाची समीक्षा करण्याच्या हेतूने आपल्या भूतकाळात डोकावून पाहिलं. ते चित्र परिपूर्ण किंवा फारसं आनंददायी नव्हतं. मी या संपूर्ण काळात ग्रामीण लोकांबरोबर, सामान्य माणसांबरोबर, शोषित कामगारांबरोबर राहिलो. याचा मला आनंद आहे.
इथं आपल्यासमोर असाच एक ग्रामीण माणूस उभा आहे.’’
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com