कुतूहल: सुवास घातकसुद्धा!
गंध हा प्रामुख्यानं वायू अथवा बाष्प याद्वारे गंधपेशीस उद्दीपित करतो. त्याचं प्रमाण जरी अल्प असलं तरी त्यामुळे गंधज्ञान होऊ शकतं. हा वायू त्वचेवरील श्लेष्मात विरघळतो तेव्हाच गंधपेशी उद्दीपित होऊन चेतातंतूद्वारे मेंदूकडे संवेदना पाठवली जाते आणि आपल्याला त्या त्या पदार्थाचं गंधज्ञान होते. ज्या गंधानं आपलं मन प्रफुल्लित व उत्साहित होतं असे गंध आपल्याला आवडतात आणि त्या गंधाला आपण ‘सुवास’ असं म्हणतो.
परफ्यूम्सना मनमोहक सुवास येतात, खाद्यपदार्थाना मन चाळवणारे वास येतात, स्वच्छता करायच्या रसायनांतून मन प्रसन्न करणारे गंध सोडले जातात, सौंदर्यप्रसाधनांना मन आकर्षून घेणारे सुगंध लाभतात, औषधांना उग्र पण मनाला बरे होण्याचा दिलासा देणारे वास येतात, तर कचऱ्याला किंवा खराब झालेल्या पदार्थाना मन कंटाळून जाईल असे दर्प असतात. गंध आणि परिणाम यांची सांगड आपला मेंदू घालत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या मनात भावना उमटत असतात. पण असा हा आपला तल्लख मानवी मेंदूही कधी तरी फसतो बरं का! रासायनिक शस्त्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उग्र वास येत असणार हा असाच आपला एक समज! पण शस्त्र म्हणून वापरात असलेल्या बऱ्याच रसायनांना ना रंग असतो ना गंध! याला काही अपवादही आहेत. ‘ताबून’ हा पदार्थ रंगहीन असून बाष्पनशील आहे (याला जीए असंही म्हणतात.). या द्रवाला उष्णता मिळताच त्याचं वाफेत रूपांतर होतं. ताबूनची वाफ झटकन हवेत पसरते आणि तिला एखाद्या फळासारखा मंद सुगंध येतो. त्यामुळे माणसांच्या तो सहजी लक्षात येत नाही आणि आला तरी त्रासदायक वाटत नाही. पण ‘ताबून’ हे माणसांसाठी अत्यंत घातक असं रसायन आहे. त्यामुळे युद्धामध्ये त्याचा उपयोग रासायनिक शस्त्र म्हणून केला जातो. असंच आणखी एक रसायन म्हणजे ‘सोमन’ किंवा जीडी. सोमन हा पदार्थ द्रव स्वरूपात असून बाष्पनशील व क्षयकारी आहे. याला कापरासारखा वास येतो आणि हा आरोग्याला विनाशकारी असतो.
डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,
चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व- ‘व्यापक कार्याची उभारणी’
‘‘गेली ५० वर्षे आपल्या देशात ‘कन्स्ट्रक्टिव्ह वर्क’चा घोष होत आहे. पण विचार केला तर असे दिसून येते की, कन्स्ट्रक्शनपेक्षा डिस्ट्रक्शनच जास्त झालेले आहे. कारण, पहिली रचना माणसाची करायवयास पाहिजे. तिकडे दुर्लक्ष करण्यात आले. जवळ पैसा मुळीच नाही तरीही घर बांधण्याचा विचार करण्यासारखेच हे अव्यवहार्य आहे. जर व्यवस्थित, सुसंघटित अनुशासनबद्ध शक्ती असेल, संघटनेचे घटक केवळ दक्ष-आरमशिवाय इतरही अनेक गोष्टी आपल्या बोलण्यातून आणि आचरणातून समाजाला शिकविण्याकरिता समर्थ असतील, म्हणजेच हे पहिले कन्स्ट्रक्शन नीट झाले असेल तर कार्ये होऊ शकतील.’’
गोळवलकर गुरुजी रा. स्व. संघाकडे असलेल्या मनुष्यबळाविषयी १९४९ सालच्या भाषणात (‘श्रीगुरुजी समग्र दर्शन, खंड-दोन’) म्हणतात – ‘‘एक विशिष्ट प्रकारची संघटनेची व्यवस्था उत्पन्न होईपर्यंत समाजसेवेची अन्यान्य कार्ये होऊ शकत नाहीत हे जाणून, त्या मर्यादेपर्यंत पोचण्याचा कसोशीचा प्रयत्न आज आवश्यक आहे. त्या मर्यादेकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या बोलण्याने, कृतीने, व्यवहाराने व चारित्र्याने सर्व हा भाव निर्माण केला पाहिजे की, समाजसेवा करण्याची पात्रता कोणात असेल तर ती यांच्यात आहे. हे कार्य जर नसेल तर अखंड राष्ट्ररूपाने समाज उभा कसा राहू शकेल?.. आज आपली जी स्थिती आहे तिचा विचार करता, कार्याची योग्यता विशिष्ट मर्यादेपर्यंत नेण्याऐवजी, भिन्नभिन्न समाजकार्याचाच अंगिकार करीत बसणे मला तरी सर्वस्वी अयोग्य वाटते. जनतेची अपेक्षा, आपल्या योग्यतेविषयीची कल्पना, शतगुणित झालेली आहे, तर इकडे कार्याची अवस्था घटलेली आहे. अशा स्थितीत आपण कार्ये घेऊन समाजरचना करू शकू, या गोष्टी व्यर्थ होत. जर आपण सारी शक्ती लावून अगर साऱ्या लहानसहान गोष्टी बाजूला सारून, आपल्या पद्धतीने तेजस्वी, प्रतिष्ठासंपन्न, प्रभावी व व्यापक कार्याची उभारणी शीघ्रातिशीघ्र केली नाही तर मी निश्चयपूर्वक आपल्याला सांगतो की, वुई हॅव नो फ्यूचर, अॅब्सोल्यूटली नो फ्यूचर.. अर्थात आपणास भविष्यकाळ नाही.. मुळीच नाही!’’
मनमोराचा पिसारा- भये व्यापिलें ब्रह्मांड
समर्थानी मनाच्या श्लोकामधून मानसिकतेमधल्या गुणावगुणांचा वेध घेतला. मन कसं असायला हवं हे सांगताना, ते कसं नसावं, हेही सांगायला ते विसरत नाहीत. मनाच्या विकासाला आड येणारा सर्वात मोठा अडथळा असतो भयभीततेचा. हे भय मन व्यापून टाकतं, इतकं की, मनाच्या अवकाशात काही शिल्लक राहत नाही. या भीतीची दोन वैशिष्टय़ समर्थानी इथे मांडली आहेत.
एक म्हणजे भीतीचा सर्वव्यापीपणा येतो कुठून? तर भीतीचं उगमस्थान मृत्यूच्या भयापाशी आहे. स्वत:चं अस्तित्व नष्ट होण्याच्या भीतीमध्ये त्याचं मूळ आहे. (मग ते अस्तित्व नष्ट करणारी व्याधी असो की, नैसर्गिक आपत्ती असो.)
दुसरं वैशिष्टय़ मनाच्या अज्ञानात सामावलेलं आहे. अज्ञान कसलं? तर अद्वैत म्हणजे काय याविषयीचं अज्ञान. एकूण अज्ञान आणि भीती यामुळे मन अडाणी होतं आणि त्यामुळे दुर्बल होतं.
समर्थाच्या बलोपसानेत मनाच्या सशक्तीकरणाला केंद्रस्थान आहे.
ते म्हणतात,
भये व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे।
भयातीत ते संत आनंत पाहे।।
जया पाहतां द्वैत काही दिसेना।
भय मानसी सर्वथा ही असेना।। १३६।।
ते मनाला उद्देशून म्हणतात, सारे ब्रह्माण्ड मृत्यूच्या भयाने व्याकूळ झाले आहे. सर्वाच्याच मनात भीती ठाण मांडून बसली आहे. त्या भयामुळे सारेजण दीनवाणे नि केविलवाणे झाले आहेत. या भीतीमुळे गांगरून गेलेल्या, हादरलेल्या, भेदरलेल्या लोकांना आता सुटकेचा मार्ग दिसत नाहीये. सारे दिङ्मूढ, किंकर्तव्यमूढ झाले आहेत.
असे अज्ञ आणि अडाणी जन दिसेल त्या गोष्टीवर अंधविश्वास टाकून भीतीवर विजय मिळवू पाहत आहेत. हे सारे उपाय निर्थक आहेत.
परंतु या भयभीतांमध्ये काही असे आहेत की, ज्यांनी या भीतीच्या आरपार पाहिले आहे, अशी संत मंडळी भयातीत आहेत.
संतमंडळींनी द्वैतरूपी अज्ञानाचा भेद केलेला आहे. त्यांना विश्वरूप चैतन्यांची जाणीव झाल्यामुळे सर्वाच्या ठायी त्यांना एकच एक भाव दिसतो. त्यांनी जीवनाचे खरे अद्वैतरूप आकळले आहे, अशा संतरूपी मनाचा शोध घेणं हाच भीतीवरचा अंतिम उपाय आहे.
समर्थानी मनातल्या भीतीचा नाश करण्यासाठी ज्ञानाची कास धरावी, अद्वैत तत्त्वाचे स्वरूप समजून घ्यावे, असं अनेक श्लोकांत म्हटलेलं आहे, पण अज्ञानामधून भय निर्माण होतं याचा उलगडा इथे सहज केला आहे.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com