भारत जगातील सातव्या क्रमांकाचा लोकर उत्पादन करणारा प्रमुख देश आहे. जागतिक लोकर उत्पादनांपकी भारतात दोन टक्के उत्पादन होते. भारतीय लोकरीचे तीन प्रकारांत ग्रेडिंग केले जाते. भारतात ८५ टक्के काप्रेट ग्रेड, १० टक्के कोअर्सर (जाडीभरडी) ग्रेड व ५ टक्के एपारेल ग्रेड प्रकारच्या लोकरीचे उत्पादन होते. सरकारी धोरणे व प्रोत्साहन तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर यामुळे देशांतर्गत लोकर प्रक्रिया उद्योग वाढत असून लोकरीच्या उत्पादनांच्या निर्यातीतही वाढ होत आहे. अमेरिका व युरोपीय संघ भारताच्या लोकर उत्पादनांच्या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत.
भारतात उत्पादन होणारी लोकर इथल्या उद्योगांसाठी पुरेशी नाही. भारत मोठय़ा प्रमाणात कच्च्या स्वरूपाची लोकर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, चीन या देशांकडून आयात करतो. या लोकरीपासून बनवलेली विविध उत्पादने देशांतर्गत वापरासाठी व निर्यातीसाठी वापरली जातात.
भारतीय लोकर उद्योग आकाराने लहान असून विखुरलेल्या स्वरूपात आहे. देशातील ४० टक्के लोकर उद्योग केंद्रे पंजाब, २७ टक्के हरियाणा आणि १० टक्के राजस्थान या इतर राज्यांत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात या राज्यांमध्ये काही महत्त्वाचे मोठे उद्योग आहेत. लोकर उद्योगामुळे भारतात अंदाजे १५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकर प्रामुख्याने मेंढीपासून मिळवली जाते. तसेच काही प्रमाणात लोकरीचे उत्पादन अंगोरा, पश्मिना जातींच्या शेळ्यांपासून मिळते. अंगोरा शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस मोहर, तर पश्मिना शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस पश्मिना म्हणतात. मोहर व पश्मिना लोकर मऊ, तलम, उबदार व चकाकणारी असते. त्यापासून जगप्रसिद्ध काश्मिरी शाली बनविल्या जातात. तसेच स्वेटर, हिवाळी कानटोपी, स्कार्फ, हातमोजे व इतर उबदार कपडे बनवले जातात. लोकरीपासून विणकाम करुन विविध वस्तू बनवण्याचा उद्योग जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या पहाडी प्रदेशात मोठय़ा प्रमाणात स्वयंरोजगार पुरवतो. भारतीय मेंढय़ांपासून मिळणारी लोकर जाडय़ा-भरडय़ा स्वरूपाची असून तिच्यापासून स्वेटर, ऊबदार कपडे, शाली, मफलर, चादरी, हातमोजे, गालीचे, सतरंज्या, ब्लँकेट, पायदाणे, कांबळ, घोंगडय़ा इत्यादी दररोजच्या वापरातील वस्तू बनवल्या जातात.
जे देखे रवी.. – पौर्वात्य देशांतले धर्म
‘देव आहे’ , ‘देव नाही’, किंवा ‘मला कळत नाही’ या त्रिसूत्रीशिवाय विचार कसा करायचा या प्रश्नाचे उत्तर कन्फुशियस या चीनमधल्या एका साध्या माणसाने अडीच हजार वर्षांपूर्वी त्यांच्या नियमांमधून देऊन ठेवले आहे. पौर्वात्य देशातले धर्म देवादिकांशिवाय तगले आहेत हे वाचून आश्चर्य वाटते पण तूर्तास हे नक्कीच की चीन देशात फार पूर्वीपासून देवपरंपरा अस्तित्वात नाही. भारताबद्दल नंतर बघूच.
कन्फुशिअसने (१) वस्तूंचे (वस्तुस्थितीचे) निरीक्षण करा (२) ज्ञान किंवा विज्ञानाच्या कक्षा रुंद करा (३) हे करताना प्रामाणिक राहा (४) या प्रामाणिकेतून मन सुधरवा (४) अशा तऱ्हेने जीवनाचा स्तर वाढवा (६) या नव्या व्यक्तिमत्त्वातून कुटुंबाचे आधार बना (७) अशा क्रमाने समाज आणि राज्यात सुसूत्रता आणा (आणि मग शांतीचा प्रसार होतो) असे नियम घालून दिले होते.
या नियमांची सुरुवात निरीक्षणाने होते. कन्फुशअसचा नातू त्झुस्सुने नंतर या निरीक्षणातून या विश्वातले मैत्र समजते आणि आपल्या अंतरंगात या मैत्राचे बी पेरले जाते असे पुढचे रहस्य उलगडले. इंग्रजीत harmony हा शब्द आहे. त्याचा अर्थ देताना मेळ सुसंगती स्वरैक्य असे शब्द दिसतात; पण ज्ञानेश्वरांनी वापरलेल्या मैत्र शब्दातले माधुर्य या शब्दांना नाही म्हणून तो शब्द वापरला. harmony आणि मैत्र यातूनच सुवर्णमध्य सिद्ध होतो, असेही त्याचे म्हणणे होते. प्लॅटोनेही Golden Mean हे ध्येय असले पाहिजे, असे तत्त्व मांडले. त्झुस्सुच्या मते माणसाचे मन निर्मळ असते. यावरच्या सात नियमांनी त्याचे चांगले पालन पोषण होते आणि मग त्याच्यात वाढ होते. याउलट त्याचा प्रतिस्पर्धी सनझुने माणसाचे मन मुळात पापी असते आणि ते शुद्ध करण्यासाठी हे नियम वापरावेत किंवा लागू पडतात, असे म्हटले आहे.
खळांची व्यंकटी सांडो/ सत्कर्मे रति लागो ही प्रार्थना मला वाटते या दोन विचारांचे एकत्रीकरण आहे.
देवाने नंदनवन केले त्यात आपल्यासारख्या अॅडम नावाच्या जीवाला ठेवले पुढे त्या अॅडमला करमेना म्हणून त्याच्या बरगडीतून इव्ह नावाची मैत्रीण तयार केली. या दोघांच्या हातून जैविक पाप घडले आणि ते पाप धुणे हे मानव जातीचे कर्तव्य ठरले आणि ते पाप शिरावर घेऊन येशूने बलिदान केले ही कथा माणसाचे मन पापी आहे किंवा होते या गृहीतकाचे पुष्टीकरण करते. भारतातल्या निदैवी विचारांचा एक पाइक गौतम बुद्ध. चीनमध्ये त्याचे विचार किंवा धर्म झपाटय़ाने पसरला कारण त्या विचारांना साजेशी पाश्र्वभूमी चीनमध्ये आधीच अस्तित्वात होती.
बुद्धाचा विचार चीनमधल्या आणि बायबलमधल्या गोष्टींशी समांतरच. बुद्धाने वापरलेले शब्द- वासना आणि दु:ख – याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – कॅन्सर : त्वचेवरील हल्ला- भाग ११
आपली समस्त त्वचा ही शरीरातील पहिले व शेवटचे ‘टॉप टॉप’ दर्जाचे संरक्षक कवच आहे. बाह्य़ वातावरणातील जीवजंतू, बदलते हवामान यांचा परिणाम शरीरातील आतील अवयवांवर होऊ नये म्हणून आपली त्वचा तुमची-आमची मोठीच काळजी घेते. हे बाह्य आवरण शरीरातील मांस, स्नायू, अस्थी, मज्जा यांच्याकडून रोगजंतू जाऊ नये म्हणून दिवस-रात्र संरक्षण देत असते. तरीदेखील तुमच्या-आमच्या शरीराला कधी तरी इसब, गजकर्ण, नायटा, खाज, कोड, तीळ, वांग, ल्हासे, मुखदूषिका, तारुण्यपीटिका, शिबे, कोंडा, खपल्या अशा छोटय़ा-छोटय़ा त्वचाविकारांचा सामना करायला लागतो. काहींना सोरायसिस वा कुष्ठविकारासारख्या गंभीर त्वचाविकारांची लढाई लढावी लागते. या त्वचाविकारांत प्रवाळ, कामदुधा, मौक्तिकभस्म, उपळसरीचूर्ण, त्रिफळाचूर्ण, महातिक्त, शतावरीघृत, रक्तशुद्धी, महामंजिष्ठादि काढा ही औषधे पोटात घेण्याकरिता उपयोगी पडतात. बाह्य़ोपचारार्थ एलादि तेल, शतधौतघृत, कंडूमलम, करंजेल, केश्यचूर्ण यांची मदत होते, पण अलीकडे दीर्घकाळच्या, छोटय़ा त्वचाविकारांचे रूपांतर कॅन्सर अवस्थेत झालेले रुग्ण वाढत्या संख्येचे आहेत.
या रुग्णांची खाज, आग, रक्त व लस वाहणे या लक्षणांत अजिबात उतार पडत नाही. रुग्ण मानसिक स्वास्थ्य गमावतो, हादरतो. रक्त तपासणीत प्लेटलेट काऊंटचे प्रमाण खूप घटलेले, तर पांढऱ्या पेशी-डब्ल्यूबीसी व ईएसआर काऊंट वाढलेले आढळतात. वरील उपायांसह पोटात घेण्यासाठी शीतप्रकृतीकरिता शिलाजित, पिंपळलाख, बिब्बातेल, सुवर्णमाक्षिक, वंगभस्म, लसूणस्वरस, तुळसस्वरस, कोरफडगरयुक्त लाक्षावटीचा निश्चयाने उपयोग होतो. पित्तप्रकृतीच्या त्वचाविकाराच्या कॅन्सर अवस्थेत उपळसरी, लाक्षाचूर्ण, मौक्तिक भस्म, प्रवाळभस्मयुक्त लाक्षामिश्रण त्वरित गुण देते. त्वचा कॅन्सरच्या या गंभीर अवस्थेत शरीर ‘रफ अँड टफ’ बनविण्याकरिता लाक्षादिघृत व लाक्षादिगुग्गुळाची मोलाची मदत होते. जय लाक्षामाता!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २ ऑक्टोबर
१८८३ > कादंबरीकार बाळकृष्ण संतुराम गडकरी यांचा जन्म. ‘महाराष्ट्र वाग्विलास’ या मासिकाचे ते संस्थापक. ‘दुर्दैवी प्रेमयोग’, ‘विजया कोणास मिळाली’, गृहिणी, शालिनी, सौंदर्यदर्शन या कादंबऱ्या आणि ‘संगीत पत्रिका’ हे नाटक त्यांनी लिहिले.
१९०७ > प्रकाशक हरीभाऊ विष्णू मोटे यांचा जन्म. मोटे प्रकाशनाचे संस्थापक असणाऱ्या मोटय़ांनी ‘प्रतिभा’ या पाक्षिकाची जबाबदारी सांभाळली. ‘एक सर्वमंगल क्षिप्रा’ हे आत्मचरित्रही त्यांचेच.
१९०८ > विचारवंत गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचा जन्म. ज्ञानदेवांपासूनच्या मराठी संतवाङ्मयातील जीवननिष्ठा त्यांनी दाखवून दिली, तसेच न्या. रानडे, म. फुले आणि आगरकर यांच्या विचारांचा परामर्श घेतला. समाजाच्या सर्व अंगांकडे पाहणाऱ्या वैचारिक दृष्टीने गंबांनी लिखाण केले. त्यांचे निधन १९८८ मध्ये झाले, त्यापूर्वीच्या दशकभरात त्यांनी दलित साहित्याचे स्वागत का झाले पाहिजे, याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली होती.
१९१७ > कथा-कादंबरीकार, अनुवादक यमुना शेवडे यांचा जन्म. ‘प्रेमपत्र व इतर कथा’, ‘हरवलेला गवसला’ हा कथासंग्रह, ‘जीवनसंगीत’, ‘पूर्णाहुती’ या कादंबऱ्या, तर ‘ज्वालामुखी’, ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हे अनुवाद आणि ‘साथसंगत’ हे आत्मवृत्त प्रसिद्ध.
– संजय वझरेकर