पुणेकर वाहतुकीची किती शिस्त पाळतात? या प्रश्नाचे उत्तर अगदीच निराशाजनक आहे. सिग्नलची शिस्त किती जण पाळतात, हे पाहण्यासाठी ‘टीम लोकसत्ता’ने केलेल्या नमुना पाहणीत असे आढळून आले की, पुण्यातील तब्बल एक-तृतीयांश (सुमारे ३१ टक्के) वाहनचालक राजरोसपणे सिग्नल तोडतात. पोलीस नसतील तर अपवादानेच सिग्नल पाळले जातात. सिग्नल पाळणाऱ्यांपैकी बहुतांश जण तो तोडण्याची संधी नसते म्हणून ‘नाइलाजास्तव’ तो पाळतात. स्वत:हून सिग्नल पाळणाऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी आहे.
या बेशिस्तीमुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतोच, पण ही स्थिती अपघातालासुद्धा कारणीभूत ठरते. अनेक सिग्नलच्या ठिकाणी उभी राहणारी वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबतात. परिणामी इतर बाजूंनी येणाऱ्या वाहनांना हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर चौकात वाहतुकीची कोंडी होते किंवा वाहतूक संथ गतीने पुढे सरकते. या साऱ्या गोंधळात पादचाऱ्यांचे भयंकर हाल होतात. बहुतांश चौकात झेब्रा क्रॉसिंग आहेत. तिथे पादचाऱ्यांसाठी सिग्नलही असतात. प्रत्यक्षात मात्र हा सिग्नल बहुतांश वाहनचालक जुमानत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत होती किंवा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता.
काय पाहणी केली?
– शहराच्या वेगवेगळ्या भागातील सिग्नलचे दहा चौक निवडले.
– या सर्व सिग्नलवर वाहतूक पोलीस हजर नसताना वाहतुकीची काय स्थिती असते त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी शुक्रवारी दुपारच्या वेळेत केली. प्रत्येक सिग्नलवर अर्धा तास निरीक्षण केले.
– एका चौकातून किती वाहने गेली, त्यातील किती वाहनांनी सिग्नल मोडला त्याच्या नोंदी घेतल्या.
– सिग्नल मोडण्याचे विविध प्रकार, त्यामुळे निर्माण होणारे धोके याच्याही वेगळ्या नोंदी घेतल्या.
चौकाचे नाव मोजलेली वाहने सिग्नल तोडणारी वाहने टक्केवारी
सातारा रस्ता (सिटीप्राईडजवळ) ७८० ३१५ ४० टक्के
महाराष्ट्र साहित्य परिषद चौक १७५ ७६ ४३ टक्के
लक्ष्मी रस्ता (शगुन दुकानाजवळ) ३०५ २२३ ७३ टक्के
पुणे महापालिका चौक १०२० ४४० ४३ टक्के
गणेशखिंड रस्ता (सेंट्रल मॉलजवळ) ७८० १८० २३ टक्के
सेना. बापट रस्ता (मॅरियट हॉटेलजवळ) ८९० ३१० ३४ टक्के
सिंहगड रस्ता (राजाराम पुलाजवळ) ९०० ३०० ३३ टक्के
मेहेंदळे गॅरेजजवळील सिग्नल ७५५ ९० ११ टक्के
शास्त्री रस्ता (गांजवे चौक) २६६ ३५ १३ टक्के
फग्र्युसन रस्ता (ज्ञानेश्वर पादुका चौक) २०६० ५४० २६ टक्के
सर्व सिग्नलवर मोजलेली वाहने- ७९३१
त्यापैकी सिग्नल तोडणारी वाहने- २५०९
सिग्नल तोडणाऱ्यांची टक्केवारी- ३१ टक्के
या पाहणीतील महत्त्वाची निरीक्षणे-
– सिग्नलला एखादा वाहनचालक थांबला तर मागील काही जण सिग्नलला थांबतात, असे चित्र सर्वच चौकांत पाहायला मिळाले. परंतु एखाद-दोघांनी सिग्नल तोडल्यावर त्याच्या मागे वाहनांचा लोंढाच सिग्नल तोडून जात असल्याचे दिसून आले.
– राजाराम पुलाजवळ सिग्नल मोडणाऱ्यांमध्ये शेअर रिक्षांचे प्रमाण लक्षणीय होते.
– ज्ञानेश्वर पादुका चौकात वडारवाडीच्या बाजूने येणारी वाहने लाल सिग्नल असताना मोठय़ा संख्येने पुढे जात होती. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी व अपघातास निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झालेली दिसली.
– ज्ञानेश्वर पादुका चौकात मॉडर्न महाविद्यालयाकडून येणाऱ्या पोलिसांच्या जीपनेही सिग्नल तोडला.
– सर्वच सिग्नलवर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसत होते. पादचाऱ्यांचा हिरवा सिग्नल लागूनही त्यांना रस्ता ओलांडणे शक्य होत नव्हते. ही स्थिती विशेषत: ज्ञानेश्वर पादुका चौक, राजाराम पुलाचा चौक, महापालिकेचा चौक, मॅरियट हॉटेलचा चौक व सातारा रस्त्यावरील सिटीप्राईडच्या चौकात सर्वाधिक दिसून आली.
– गांजवे चौकात मुळातच चौकाच्या मध्यापर्यंत येऊनच वाहने उभी राहत होती. त्यामुळे दुसऱ्या बाजूने सिग्नल सुटलेल्या वाहनांची कोंडी होत होती.
– मसाप चौकात अलका चित्रपटगृहाकडे जाणारी वाहने प्रत्येक वेळी खूप पुढे येऊन थांबतात. त्यामुळे नवी पेठ विठ्ठल मंदिराकडून येऊन स.प. महाविद्यालयाकडे वळणाऱ्या वाहनांना हिरवा सिग्नल मिळाल्यावर त्रास होत होता.
– मेहेंदळे गॅरेजजवळील सिग्नलवर लाल सिग्नलची १५ सेकंद राहिली असतानाच चौकाच्या मध्यापर्यंत वाहने येऊन उभी राहत होती.
– सातारा रस्त्यावर स्वारगेटकडून सिटीप्राईडकडे जाणाऱ्या वाहनांनी हिरवा सिग्नल संपताना शेवटी सिग्नल तोडणे अत्यंत धोकादायक ठरत होते. मार्केटयार्डकडून स्वारगेटकडे वळणाऱ्या वाहनांना त्याच वेळी हिरवा सिग्नल मिळाल्याने वाहतूक कोंडी होत होती. पीएमपीएमएलच्या व खासगी बस तसेच स्कूल बसही सर्रास सिग्नल तोडत असल्यामुळे अपघाताचा धोका या चौकात अधिक दिसला.
(पाहणी व संकलन- संपदा सोवनी, रसिका मुळय़े, अक्षय फाटक)