पीएमपीच्या नादुरुस्त गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम दिसू लागला असून गेल्या दहा दिवसात १६७ नादुरुस्त गाडय़ा मार्गावर आणण्यात आल्या आहेत. सुटे भाग नसल्यामुळे पीएमपीच्या सातशे गाडय़ा गेल्या पंधरवडय़ात बंद होत्या. त्या गाडय़ा आता मार्गावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पीएमपीच्या गाडय़ा मोठय़ा संख्येने बंद असल्याची परिस्थिती होती. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी बंद गाडय़ांपैकी जास्तीतजास्त गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी नियोजन केले आहे. या गाडय़ांना लागणारे सुटे भाग खरेदी केले जात नसल्यामुळे गाडय़ा मार्गावर येऊ शकत नव्हत्या. गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी सुटे भाग खरेदी करणे आवश्यक होते. मात्र सुटे भाग खरेदी करण्यासाठी लागणारा निधी पीएमपीला उपलब्ध होत नव्हता. अशा परिस्थितीत दैनंदिन जमा होणाऱ्या उत्पन्नातील सहा टक्के रक्कम सुटे भाग खरेदीसाठी स्वतंत्र खात्यात जमा करावी, अशी उपाययोजना करण्यात आली. तसा निर्णयही गेल्या आठवडय़ात संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नातील सहा टक्के रक्कम या खात्यात जमा होऊ लागली आहे.
निधी उपलब्ध होताच बंद गाडय़ांची आवश्यक दुरुस्ती करणे, देखभाल करणे, सुटे भाग उपलब्ध करणे ही प्रक्रिया पीएमपीमध्ये सुरू झाल्यामुळे बंद गाडय़ा मार्गावर यायला सुरुवात झाली आहे. पीएमपीच्या ७०० गाडय़ा १४ डिसेंबर रोजी बंद होत्या. त्यानंतर १९ डिसेंबर पासून निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. त्यातून जुनी देणी देण्याबरोबरच सुटय़ा भागांची खरेदी सुरू आहे.  त्यासाठी आतापपर्यंत तीन कोटी वीस लाख रुपये देण्यात आले आहेत. स्वतंत्र खाते उघडण्याची प्रक्रिया सोमवारी करण्यात आली असून त्यातून निधी उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader