पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखडय़ात मौजे चऱ्होलीतील २५ एकर जागेचे निवासीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांनी प्रचंड आटापिटा चालवला आहे. पालिकेतील या सूत्रधार जोडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाखाली ‘दुकानदारी’ केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्याच वर्तुळातून होत असून हे फेरबदल करण्यास खासदार गजानन बाबर तसेच नगरसेविका सीमा सावळे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
चऱ्होलीतील निवासीकरण करण्यास कोणतेही शास्त्रोक्त कारण नसून केवळ भूखंडमाफियांना खुश करण्यासाठी तसेच ‘अर्थ’ कारणातून हा ‘उद्योग’ होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. चऱ्होलीतील २५ एकर भूखंडाचे निवासीकरण करण्याचा फेरबदल प्रस्ताव २७ जुलै २०१३ ला सभेसमोर चर्चेसाठी होता. निव्वळ धंदेवाईक स्वरूपाच्या या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला. तथापि, बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर तातडीची बाब म्हणून या फेरबदलावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्यात आल्या. तेव्हा खासदार गजानन बाबर, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, शारदा बाबर, सारंग कामतेकर यांनी लेखी हरकत घेतली. ती हरकत नवे आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. चऱ्होलातील २५ एकर क्षेत्र हे ‘डोंगरमाथा व डोंगर उतार’ असल्याने ते ‘ना विकास’ विभागातच ठेवण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, सत्तेच्या जोरावर फेरबदल करण्याचा डाव राष्ट्रवादीने घातला आहे. प्रस्तावित फेरबदल पर्यावरणाचा ऱ्हास करणारे असल्याचे बाबर व सावळे यांनी म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून लोकहिताचे अनेक प्रस्ताव धूळ खात पडले असताना नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे यांनी तत्परता दाखवून २५ एकरच्या भूखंडाच्या निवासीकरणाला प्राधान्य दिल्याने साशंकता बळावली आहे, याकडे सावळेंनी लक्ष वेधले आहे.

Story img Loader