राज्यातील सर्वोच्च, तर देशातील पाचव्या क्रमांकाचा उंच राष्ट्रध्वज कात्रजमध्ये, ध्वजाची लांबी ९० फूट, रुंदी ६० फूट, वजन १०० किलो
कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या निसर्गरम्य परिसरात तब्बल ७२ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. उंचीचा विचार करता हा ध्वजस्तंभ राज्यात प्रथम क्रमांकाचा तर देशात पाचव्या क्रमांकाचा ठरला असून या भव्य आणि उंच ध्वजस्तंभामुळे पुण्याच्या वैभवामध्ये आणखी भर पडली आहे.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या राष्ट्रध्वजाची मूळ संकल्पना स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांची आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया’च्या मानकांनुसार राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.
त्यात प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत राष्ट्रध्वज प्रकाशमान होण्यासाठी विशिष्ट विद्युत व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. राष्ट्रध्वजाच्या खांबावरील भागात ‘अ‍ॅव्हिटेशन ऑबस्ट्रक्शन लॅम्प’ बसविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिसराचे सुशोभिकरण
जलाशयाच्या मध्यवर्ती भागातील बेटावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला असून तेथे आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथालयाचीही उभारणी या परिसरात करण्यात आली आहे. जलाशयातील पाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाईसह संगीत कारंजे विकसित करण्यात आले असून ते या भागाचे आकर्षण ठरले आहे. बालगोपाळांसाठी साकारलेली फुलराणी हेही या भागाचे आणखी एक आकर्षण आहे.

राष्ट्रध्वजाची वैशिष्टय़े
’ राष्ट्रध्वजाच्या खांबाची उंची २३७ फुट असून वजन १४ टन एवढे आहे.
’ पाया साधारण साडेचार फूट व्यासाचा असून १ हजार मेगावॉट क्षमतेच्या दिव्यांमुळे रात्रीच्या अंधारातही राष्ट्रध्वज सहज दिसू शकणार आहे.
’ या उंच ध्वजस्तंभावर लावण्यात आलेल्या ध्वजाची लांबी ९० फुट असून
रुंदी ६० फुट आहे. या ध्वजाचे वजन १०० किलो एवढे आहे.
’ त्याला जमिनीवर अंथरण्यासाठी तब्बल सहा गुंठे जागेची आवश्यकता आहे.
’ या कामासाठी एकूण १.५ कोटी रुपये खर्च आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 237 feet tall nations flag