परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र सध्या देशात आघाडीवर असून देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांपैकी २५ टक्के पर्यटक हे महाराष्ट्राला पसंती देत असल्याचे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडिया (असोचम) या संस्थेच्या अहवालावरून समोर आले आहे.
‘असोचम’ने परदेशी पर्यटकांकडून देशाला मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार सर्वाधिक परदेशी पर्यटक महाराष्ट्रामध्ये येत आहेत. देशात येणाऱ्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी पंचवीस टक्के पर्यटक हे महाराष्ट्रात येतात. मात्र, महाराष्ट्रात भेट देणाऱ्या स्थनिक पर्यटकांचे प्रमाण फक्त ६.७ टक्के आहे. महाराष्ट्रात वर्षभरात विविध ठिकाणी भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या ही जवळपास ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे. राज्यात मुंबईमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अधिक आहे. पर्यटन स्थळांमध्ये अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना परदेशी पर्यटकांची अधिक पसंती आहे. महाराष्ट्रानंतर तामीळनाडू (१७ टक्के), दिल्ली (११ टक्के), उत्तर प्रदेश (१० टक्के) आणि राजस्थान (८ टक्के) या राज्यांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. भारतात येणारे सत्तर टक्के पर्यटक हे या पाच राज्यांमध्ये येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारतातील पर्यटन व्यवसायाच्या वाढीचा दर हा १३ टक्के असून २०१५ पर्यंत परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून देशाला मिळणाऱ्या परदेशी चलनामध्ये २६ दशलक्ष अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचेल, असे असोचमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जानेवारी ते जून २०१३ या कालावधीमध्ये ५० हजार ४४८ कोटी रुपयांचे परदेशी चलन पर्यटकांकडून भारताला मिळाले आहे. परदेशी पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे भारताच्या पर्यटन क्षेत्राची जागतिक क्रमवारी सुधारली आहे. भारत आता जगात १६ व्या क्रमांकावर आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी सांगितले, ‘‘राज्यात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. मात्र, आलेल्या पर्यटकांना टिकवून ठेवणे हे राज्यापुढील आव्हान आहे. त्यासाठी मुंबईला समोर ठेवून पर्यटन आराखडा तयार झाला असून त्याला लवकरच संमती मिळेल. त्याचबरोबर ठरावीक ठिकाणांपलीकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही उपाययोजनांची आवश्यकता आहे.’’