पुणे व पिंपरीत सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असताना निगडीतील जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन १४ चौकांमध्ये ४२ सीसीटीव्ही बसवण्याचा संकल्प केला व पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत, हा प्रयत्न कौतुकास्पद व प्रेरणादायी असून यापुढे तो ‘यमुनानगर पॅटर्न’ म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले.
वाढती गुन्हेगारी व पोलिसांच्या मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षिततेचा उपाय म्हणून यमुनानगर येथे लोकवर्गणीतून बसवण्यास सुरुवात केली, त्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचे उद्घाटन उमापांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका उबाळे, संगीता पवार, शरद इनामदार, राम उबाळे, धनाजी शिंदे आदी उपस्थित होते.
उमाप म्हणाले, साखळी चोऱ्या, घरफोडय़ा व एकूणच गुन्हेगारी घटना पाहता सीसीटीव्हीची गरज आहे. यापूर्वी, अनेक घटनांमध्ये त्याची उपयुक्तता सिध्द झाली आहे. वाढते क्षेत्र व लोकसंख्या व त्या तुलनेत पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने नागरिकांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. उबाळे म्हणाल्या, प्रत्येकाला सुरक्षा कर्मचारी ठेवणे परवडणारे नाही. यमुनानगरमध्ये आठ दिवसात चार घरफोडय़ा झाल्याने नागरिक भयभीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवण्याचा विचार पुढे आला. व्यापारी, उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक एकत्रित आले, खर्चाचा वाटा उचलण्याची तयारी दाखवली. यामुळे आगामी काळात गुन्हेगारी घटनांना आळा बसू शकेल.

Story img Loader