पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अकरावीसाठी यावर्षी द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या ५ हजार ९५० जागा उपलब्ध असून दर वर्षीप्रमाणेच यावर्षीही द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया टेबल अॅडमिशन पद्धतीने होणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील एकूण ७२ संस्थांमध्ये द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम राबविले जात आहेत. यावर्षी एकूण ५ हजार ९५० जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये संगणकशास्त्र विषयाच्या ३ हजार १७५ जागा, इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या २ हजार ३५० जागा, मेकॅनिकल मेन्टेनन्स आणि इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स विषयासाठी प्रत्येकी १०० जागा, स्कूटर, मोटार सायकल रिपेअरिंग विषयासाठी १७५ जागा, तर जनरल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ५० जागा उपलब्ध आहेत.
तांत्रिक विषय घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एकूण जागांपैकी ४० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेश अर्जाची विक्री १२ ते १४ जून या कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये, त्यानंतर १७ तारखेपर्यंत मुख्य केंद्र (आबासाहेब गरवारे महाविद्यालय) आणि ११ उपकेंद्रांवर होणार आहे. १८ आणि १९ जूनला फक्त मुख्य केंद्रावर अर्ज विक्री होणार आहे. १६ जूनपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, तर २२ जूनला द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. २३ जूनला गुणवत्ता यादीबाबतचे आक्षेप स्वीकारण्यात येणार असून २४ जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २५ ते ३० जूनपर्यंत टेबल अॅडमिशन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहामध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी पाच हजार जागा
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अकरावीसाठी यावर्षी द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या ५ हजार ९५० जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया टेबल अॅडमिशन पद्धतीने होणार आहे.
First published on: 10-06-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5000 seats available for bifocal branch for 11th std admission