पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पाच हजारांहून अधिक छोटय़ा- मोठय़ा मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जात असला, तरी त्यातील ५८५ मंडळांनीच उत्सवासाठी महावितरण कंपनीकडून अधिकृत वीजजोड घेतला आहे. उत्सवासाठी घरगुतीपेक्षा कमी दरात मंडळांना वीजजोड देण्यात येत असतो. मात्र, मोठय़ा प्रमाणावर मंडळांनी उत्सवासाठी यंदाही घरगुती किंवा व्यावसायिक वापराच्या वीजजोडातून वीज घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

गणेशोत्सवाबरोबरच सर्वधर्मीयांच्या उत्सवासाठी महावितरण कंपनीकडून घरगुती विजेच्या दरापेक्षा कमी म्हणजे प्रतियुनिट ३ रुपये ७१ पैसे या दराने वीजपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी तात्पुरता वीजजोड देण्यात येतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारचा अधिकृत वीजजोड घेणे गरजेचे असते. यंदा अधिकृत वीजजोड घेणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असली, तरी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या तुलनेत ती कमी असल्याचे दिसते. पुणे व िपपरी- चिंचवड शहरामध्ये यंदा ५८५ मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतला. त्यातील ३८१ मंडळांनी तात्पुरता, तर २०४ मंडळांनी कायमस्वरूपी वीजजोड घेतला आहे.

पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पाच हजारांहून अधिक छोटय़ा-मोठय़ा मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. अधिकृत वीजजोड घेतलेल्या मंडळांची संख्या पाहता इतर मंडळांनी एखाद्या घरातून किंवा व्यावसायिक वापराच्या वीजजोडातून वीज घेतल्याचे स्पष्ट आहे. दहा दिवसांच्या उत्सवात संबंधित वीज ग्राहकाचा वीज वापर व वीज वापराचा टप्पाही वाढतो. त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या टप्प्यात विजेचा दर वाढून ही वीज महागात पडते. उत्सवासाठी देण्यात येणाऱ्या वीजजोडासाठी वीज वापराचा एकच टप्पा असतो. त्याचप्रमाणे ती सर्वात स्वस्तही असते. त्याबरोबरच अधिकृत वीजजोड सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याने उत्सवासाठी अधिकृत वीजजोड घेणे योग्य ठरते, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

Story img Loader