‘खबऱ्या’ होऊन आपल्याला त्या ‘एरिया’ ची माहिती दे, अशी सक्ती करून वारंवार मारहाण करणाऱ्या दापोडीतील एका ‘भाई’ ला वैतागून त्याचा ‘गेम’ करण्याचा डाव त्याने रचला. पिस्तूल, चॉपर मिळवून मित्रांच्या मदतीने दोन गाडय़ा भरून ते निघाले. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांची गाडी पाहून ते गडबडले आणि पकडले गेले. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सांगवीत ही घटना घडली.
पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दीपक गुलाब भातंब्रेकर (वय २८, अजंठानगर, चिंचवड), मंगेश बापू पालखे (वय २३, चिंचवड), अजित दिनकर जाधव (वय २८, काटे चाळ, दापोडी), आशिष माधव गजभिव (वय २२, एस.टी. रोड, दापोडी), आकाश सुरेश वाल्मीकी (वय २३, निकाळजे चाळ, दापोडी), अमोल कचरू समिंदर (वय २६, आकुर्डी), संजय कृष्णा शेलार (वय २९), अजय कृष्णा शेलार (वय २६, दोघेही दांडेकर पूल, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
बुधवारी रात्री फौजदार देवेंद्र शिंदे, विजयकुमार करे, सचिन अहिवळे, गणेश काळे, संतोष होळकर, संदीप राठोड हे पोलीस वाहनात गस्त घालत होते. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याजवळ मारुती झेन व रिक्षा वेगाने येताना दिसल्या. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच ते आणखी वेगाने जाऊ लागले. त्यामुळे पाठलाग करून नाटय़मय रीत्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे पिस्तूल, चॉपर, कोयता, नायलॉन दोरी, मिरची पूड आढळून आली. दापोडीतील गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या तुषार पंडितकडून आकाशला सतत मारहाण होत होती. तू माझा खबरी हो आणि मला टीप देत जा, असे त्याचे म्हणणे होते. पंडितचा सततचा त्रास होत असल्याने त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी आकाशने मित्रांची मदत घेतली. मात्र, गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेने सर्व जण पकडले गेले. या कामगिरीबद्दल पोलीस पथकास पाच हजार रुपयांचे बक्षीस उमाप यांनी जाहीर केले.

Story img Loader