पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यापाठोपाठ पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मुदतपूर्व बदलीसाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी जोर लावला असल्याची माहिती पुढे आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीकर परदेशी यांच्या बदलीचा विषय अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे. परदेशी यांची सद्य:स्थितीत बदली झाल्यास अडचणीचे ठरेल, त्यांच्या समर्थनार्थ नागरिक, संस्था-संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असे चित्र पुढे आल्याने वातावरण थंड होण्याची वाट ते पाहत असल्याचे मानले जाते. याच कालावधीत डॉ. म्हसे यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सरसावले आहेत. अडीच वर्षांपूर्वी म्हसे प्राधिकरणाचे मुख्याधिकारी म्हणून रूजू झाले. त्यांच्या कार्यक्षेत्रात पिंपरी-चिंचवड परिसर मोठय़ा प्रमाणात आहे. अनधिकृत बांधकामे हाच येथील महत्त्वाचा विषय आहे. डॉ. म्हसे रुजू झाल्यापासून त्यांचे स्थानिक नेत्यांशी खटके उडत आहेत. प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे परदेशी यांच्याप्रमाणेच अडचणीचे ठरणारे म्हसे यांचीही बदली व्हावी, असा प्रयत्न सुरू आहे.
डॉ. म्हसे काम करत नाहीत, मनमानी करतात, विकासकामे न करता फक्त पाडापाडी कारवाई करतात, शेकडो एकर जमिनी हडप करणाऱ्यांविरूध्द कारवाई करत नाहीत आणि सर्वसामान्यांची घरे पाडतात, यासारख्या तक्रारी अजितदादांकडे वेळोवेळी झाल्या होत्या. मात्र, आपण नियमानुसार काम करत असल्याचे म्हसे यांचे म्हणणे होते. तथापि, यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. आता परदेशी यांच्यानिमित्ताने म्हसे यांनाही बालेकिल्ल्यातून बाहेर काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. यामध्ये काही प्रमाणात अर्थकारणाचे विषयही असल्याचे समजते. दरम्यान, बदलीसंदर्भात डॉ. म्हसे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
श्रीकर परदेशी यांच्यापाठोपाठ योगेश म्हसे यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर
पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मुदतपूर्व बदलीसाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी जोर लावला असल्याची माहिती पुढे आली आहे.
आणखी वाचा
First published on: 30-01-2014 at 03:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After pardeshi rashtrawadi now interested in dr mhase