भोसरीतील नियोजित रुग्णालय हे वाचनालयासाठी आरक्षित असलेल्या जागेवर आहे. मात्र, नियमात बसवूनच रुग्णालयाचे काम करण्यात येत आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून थोडेसे पुढे-मागे केले तर नियमात बसवता येते व प्रश्नही मार्गी लागतो, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना उद्देशून केले. महापौरांच्या प्रभागात चुकीच्या पध्दतीने झालेल्या बॅडमिंटन हॉलच्या कामाचा संदर्भ देत सुविधा पुरवताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करा, अशी तंबीही त्यांनी दिली.
भोसरी मतदारसंघातील विकासकामांचा प्रारंभ अजितदादांच्या हस्ते झाला, तेव्हा ते बोलत होते. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, आयुक्त परदेशी, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, चहुबाजूने वाढणाऱ्या व सर्व जातीधर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहणारे िपपरी-चिंचवड शहर असून पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी ‘बेस्ट सिटी’ म्हणून महापालिकेचा गौरवही केला आहे. शहराचा नियोजनबध्द विकास होत असून शहरात २४ तास पाणी देण्याचे नियोजन आहे. आपल्याकडील नद्यांचे प्रदूषित पाणी पुढे जाऊ शकते, त्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखले पाहिजे. एलबीटीबाबत तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, बहुमताचा आदर करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक नगरसेवक नितीन लांडगे यांनी केले, शुभांगी लोंढे यांनी आभार मानले.
विलास लांडे दुसऱ्याला समाधी घ्यायला लावतील!
अजितदादांनी विलास लांडे यांची फिरकी घेतली नाही, असे सहसा होत नाही. महाराष्ट्रातील संतांची परंपरा सांगत असताना अजितदादांनी अभंगवाणी गाणाऱ्या व राजकारणात समाधानी झालो असल्याची भावना व्यक्त करणाऱ्या लांडेंची पुन्हा फिरकी घेतली. संत विलास लांडे तुम्ही समाधानी झाले असलात तरी समाधी वगैरे घेऊ नका, तुमचेही शिल्प उभारावे लागेल, तुमची आम्हाला गरज आहे, असे ते म्हणाले. तेवढय़ात व्यासपीठावर बसलेल्या आझम पानसरे यांनी विलास, समाधी घेणार नाही, दुसऱ्याला समाधी घ्यायला लावेल, असे सूचक विधान करताच मोठा हास्यकल्लोळ झाला.