सलग तिसऱ्यांदा पिंपरी महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम रहावी, यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे. आगामी ‘लक्ष्य २०१७’ साठी तगडा शहराध्यक्ष मिळावा, याकरिता अजितदादांचा शोध सुरू आहे. माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, नगरसेवक जगदीश शेट्टी अशा विविध नावांची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाल्यानंतर शहराध्यक्ष योगेश बहल यांनी राजीनामा दिला, तेव्हा तो अजितदादांनी स्वीकारला नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नव्या शहराध्यक्षांची निवड करण्याच्या हेतूने त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. लांडे, पानसरे, वाघेरे यांची नावे प्राधान्याने चर्चेत आहेत. शेट्टी यांचाही विचार सुरू आहे. लांडे भोसरीतून राष्ट्रवादीचे उमेदवार होते. पक्षातील गटबाजीच्या राजकारणाने त्यांचा राजकीय ‘गेम’ झाल्यानंतर ते काहीसे अलिप्त झाले व पक्षश्रेष्ठींवरही नाराज आहेत. लांडे पक्षात राहतील का, शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील का, याविषयी साशंकता व्यक्त केली जाते. पानसरे यांनी यापूर्वी शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाले होते. पुन्हा ते शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, की दुसऱ्या कोणाचे नाव सुचवतील, याविषयी तर्कवितर्क आहेत. बहल शहराध्यक्ष होण्यापूर्वी संजोग वाघेरे यांचे नाव जवळपास अंतिम झाले होते. मात्र, जातीय समतोल राखण्यासाठी अजितदादांनी बहलांची निवड केली, तेव्हा वाघेरे बरेच नाराज झाले होते. मधल्या काळात त्यांनी ‘मातोश्री’वरही पायधूळ झाडली. आता त्यांचे नाव शहराध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चेत आहे. अजितदादा पिंपरी-चिंचवडचे ‘कारभारी’ असल्याने याबाबतचा निर्णय सर्वस्वी तेच घेणार आहेत. सेना-भाजपचे आव्हान लक्षात घेता अजितदादांना ताकदीचे व सर्व गटातटांना मान्य असणारे नाव शहराध्यक्षपदासाठी निवडावे लागणार असून त्यादृष्टीने त्यांचा शोध सुरू आहे.
‘लक्ष्य २०१७’ साठी अजितदादांकडून पिंपरीत नवीन शहराध्यक्षांचा शोध सुरू
सलग तिसऱ्यांदा पिंपरी महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम रहावी, यासाठी ‘लक्ष्य २०१७’ साठी तगडा शहराध्यक्ष मिळावा, याकरिता अजितदादांचा शोध सुरू आहे.
First published on: 01-04-2015 at 02:59 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar in search for pimpri city chairman