नगरसेवकांकडून प्रलंबित कामांची माहिती मागवली
गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात विशेषत: राष्ट्रवादीतील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर फारसा विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चे खासगी स्वीय सहायक सुनील मुसळे यांनाच पिंपरीत ‘सक्रिय’ केले आहे. पक्षात डझनभर स्थानिक नेते असतानाही स्थायी समितीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावाचा लखोटा घेऊन आलेले मुसळे त्यांची निवड होईपर्यंत ठाण मांडून बसले होते. आता त्यांच्यावर नवी कामगिरी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील नगरसेवकांच्या प्रभागातील प्रलंबित कामांची यादी करून त्याचा अहवाल ते अजितदादांना देणार आहेत.
पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, सत्ता असूनही कामे होत नाही, अधिकारी ऐकत नाही आणि महत्त्वाचे प्रकल्पांची कामे अडकून पडली आहेत, पिंपरीत राष्ट्रवादीचे डझनभर नेते असतानाही अशी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांची नेहमीची तक्रार असते. स्थायी समितीची सभा असो की पालिका सभा, अशा तक्रारींचा पाढा सदस्यांकडून कायम वाचण्यात येतो. अजितदादांनी जेव्हा-जेव्हा पक्षातील नगरसेवकांच्या बैठका घेतल्या, तेव्हा आमची काम होत नसल्याचे रडगाणे त्यांच्यापुढेही झाले. निवडणुकांच्या तोंडावर कोणत्या नगरसेवकाच्या प्रभागात कोणती कामे रखडली आहेत, याची यादी करण्याचे काम अजितदादांनी हाती घेतले आहे. विश्वासार्ह माहिती हाती असावी, यासाठी त्यांनी मुसळे यांना महापालिकेत पाठवले. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व नगरसेवकांशी चर्चा केली. ३५ नगरसेवकांशी त्यांनी संवाद साधल्याचे सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी, शहर राष्ट्रवादीत ताणलेली राजकीय परिस्थिती होती. तेव्हा स्थायी समितीच्या निवडणुकांसाठी अजितदादांनी ठरवलेली यादी घेऊन मुसळे पालिकेत आले होते. स्थानिक नेत्यांना हा प्रकार बिलकूल आवडला नव्हता. त्या उमेदवारांचीच निवड होईपर्यंत मुसळे ठाण मांडून बसले होते. त्यापाठोपाठ, आता ते नगरसेवकांची प्रभागनिहाय गाऱ्हाणे ऐकण्यासाठी दाखल झाले आहेत.
पिंपरीत राष्ट्रवादीचे डझनभर नेते असतानाही अजितदादांचे स्वीय सहायक ‘सक्रिय’
अजित पवार यांनी स्वत:चे खासगी स्वीय सहायक सुनील मुसळे यांनाच पिंपरीत ‘सक्रिय’ केले आहे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 13-07-2016 at 00:59 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar pa ask corporator to give pending works information