तीन महिन्यांत एकदाही पिंपरी-चिंचवडला फिरकले नाहीत

प्रारंभी गावखाती असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा पूर्ण कायापालट केला तरीही मतदारांनी नाकारले म्हणून तीव्र नाराज असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खप्पा मर्जी अद्यापही कायम आहे. पिंपरीतील सत्तांतर होऊन तीन महिने झाले, तरी पवार शहराकडे पुन्हा फिरकलेले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारच्या विरोधात काढलेल्या ‘संघर्ष’यात्रेत ते व्यग्र असल्याचे सांगण्यात येत असले, तरी पिंपरीतील दारुण पराभव ते अद्याप पचवू शकलेले नाहीत.

पिंपरी पालिकेच्या निवडणुका २१ फेब्रुवारीला झाल्या आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला. पालिकेच्या राजकारणात ज्या भाजपचे संख्याबळ अवघे तीन होते, त्यांनी ७७ पर्यंत झेप घेतली आणि पिंपरी पालिका राष्ट्रवादीकडून खेचून स्वत:च्या ताब्यात घेतली. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून पालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. पिंपरी-चिंचवड तसा पवारांच्या राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता, मात्र भाजपच्या लाटेत तो ढासळला. पिंपरी-चिंचवडचे कारभारी म्हणून अजित पवार काम पाहात होते. त्यांना भाजपकडून झालेल्या या पराभवाचा जबर धक्का बसला. पालकमंत्री व उपमुख्यमंत्री या नात्याने राज्य सरकारच्या मदतीने अनेक गोष्टी त्यांनी पिंपरी-चिंचवडसाठी केल्या. महापालिकेतील एकहाती सत्तेच्या माध्यमातून भरीव विकासकामेही केली. त्यामुळे एकहाती सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ होईल, असा ठाम विश्वास त्यांना होता. मात्र, मतदारांनी घडय़ाळाऐवजी कमळाला पसंती दिल्याने तो फोल ठरला. केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाचा पिंपरीच्या राजकारणात भाजपला फायदा झाला. राष्ट्रवादीचे बारा वाजवणारी भाजपच्या स्थानिक नेत्यांची रणनीती पथ्यावर पडल्याने पिंपरी पालिका भाजपच्या ताब्यात आली. पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे राष्ट्रवादीला चांगलीच महागात पडली. पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारावर योग्य वेळी  नियंत्रण न आणता त्याकडे पवारांनी कानाडोळा केला, त्याचा फटका पक्षाला बसला. राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने मात स्वीकारावी लागली, तो पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, एरव्ही आठवडय़ात एकदा, महिन्यात तीन वेळा तरी शहरात येणाऱ्या अजित पवारांनी गेल्या तीन महिन्यांपासून शहराकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. एवढे सारे करूनही मतदार पाठीशी राहिले नाहीत, याची सल पवारांच्या मनात असल्याचे पक्षवर्तुळातून सांगण्यात येते.

तगडय़ा भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची एकत्रित संघर्ष यात्रा सुरू आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या या यात्रेसाठी पवार व्यग्र आहेत, त्यामुळे ते शहरात आले नाहीत, अशी सारवासारव पक्षाचे स्थानिक नेते करत आहेत. दुसरीकडे, पिंपरीतील सत्ता गेल्याच्या नाराजीतून ते शहरात येत नसल्याची कबुली पक्षवर्तुळातून दिली जाते.

Story img Loader