पिंपरीतील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य शासनाकडून अंतिम निर्णय होण्याची प्रक्रिया सुरू असताना महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पाडापाडी कारवाई सुरूच ठेवण्याची आग्रही भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आतापर्यंत साडेचारशेहून अधिक इमारती पाडण्याची कारवाई आयुक्तांनी केली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि प्रशासनातील संघर्ष कायम आहे. विरोधकांकडून राजकीयदृष्टय़ा वातावरण तापवून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जात आहे. अशा तापलेल्या वातावरणात मागील आठवडय़ात िपपरीत आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी कायद्यात दुरूस्ती करणारे विधेयक एका महिन्यात मंजूर करू, असे आश्वासन शहरवासीयांना दिले आहे. त्यानंतरही आयुक्तांनी पाडापाडी मोहीम कायम ठेवली आहे.
पिंपरी पालिकेचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील अनधिकृत बांधकामे केली आहेत. ३१ डिसेंबरच्या आत ती बांधकामे स्वत:हून न पाडल्यास सेवेतून निलंबित करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. यातील काही कर्मचाऱ्यांनी मुंबईत जाऊन अजितदादांची भेट घेतली व गाऱ्हाणे मांडले. तेव्हा अजितदादांनी आयुक्तांना दूरध्वनी करून कडक भाषेत सुनावले, असे सांगण्यात येते. आयुक्तांच्या ‘सारथी’ उपक्रमासह अन्य कामांचे कौतुक करतानाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर अजितदादा नाराज असल्याचे सांगण्यात येते.