आमच्याकडे सात उमेदवार असल्याचा दावा करणाऱ्या व ऐनवेळी हद्दीबाहेरचा उमेदवार शोधणाऱ्या भाजपने भोसरी पोटनिवडणुकीतून सपशेल माघार घेतली असून स्वत:कडील प्रभाग शिवसेनेला देत धूर्त खेळी केली आहे. राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता म्हणून आमदार विलास लांडे यांनी भाजपचा उमेदवार पळवला आणि आता बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून युतीच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी होत आहे, असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला.
भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे, रिपाइंच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सारिका कोतवाल महायुतीच्या उमेदवार म्हणून िरगणात राहतील, असे स्पष्ट केले. एरवी एकमेकांची तोंडही न पाहणारे युतीतील बहुसंख्य नेते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले, भोसरीत राष्ट्रवादीने अर्ज भरण्यापासून दादागिरी सुरू केली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. विलास लांडे यांनी आमचा उमेदवार पळवला, भोसरीच्या घराघरात भांडणे लावली आहेत. उबाळे म्हणाल्या, बाजीराव लांडे व बंडखोरी हे जुने समीकरण असून त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध राहिला नाही. पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची यापूर्वीच हकालपट्टी झाली आहे. सारिका कोतवाल यांचे पती अशोक यांच्यावर दबाव टाकण्यासाठी लांडे सोलापूरला गेले होते, याकडे उबाळेंनी लक्ष वेधले.
गेल्या वेळी भाजप उमेदवार असणाऱ्या श्रध्दा लांडे यांनी यावेळी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारल्याने भाजपचा मुखभंग झाला आहे. नियोजित नातेसंबंधामुळे अंकुश लांडगे यांचा परिवार निवडणुकीत महायुतीपासून चार हात लांबच राहणार असल्याचे दिसते. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे भवितव्य काय, याविषयी अनेकांना धास्ती आहे. मात्र, आशा लांडगे व रवी लांडगे अजूनही भाजपमध्येच असून ते महायुतीचे काम करतील, असा दावा एकनाथ पवार यांनी यावेळी केला.
एकनाथ पवार व सुलभा उबाळे यांच्यातील कलगीतुरा वर्षांनुवर्षे जुना आहे. आमच्यात ‘एकोपा’ असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.

Story img Loader