‘‘दापोडी येथील अल्फा लावल कंपनीच्या कामगारांच्या समर्थनार्थ स्वीडन येथे करण्यात आलेल्या निदर्शनात ‘अल्फा’च्या तेथील कामगारांचा समावेश नाही. ही मंडळी डाव्या विचारसरणीची व इंटरनेटवर विविध विषयांवर ब्लॉग चालवणारी आहेत. त्यांचा कंपनीशी काहीही संबंध नाही,’’ असे अल्फा लावलच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
‘अल्फा’च्या दापोडी येथील कारखान्यातील ४०२ कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी म्हणून सामावून घ्यावे, या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या कामगारांना कंपनीच्या स्वीडन येथील कामगारांनी पाठिंबा देऊन तिथे निदर्शने केल्याचा दावा येथील कामगारांचे नेते यशवंत भोसले यांनी केला होता. याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जॉन हेडेमन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना कंपनीची बाजू मांडली. हेडेमन यांनी सांगितले, की स्वीडनमध्ये आंदोलन करणारे लोक कंपनीचे कामगार नाहीत, त्यांचा कंपनीशी संबंध आला नाही. ते इंटरनेटवर ब्लॉग चालवणारे ब्लॉगर आहेत. त्यापैकी काही मंडळी डाव्या विचारसरणीची आहेत.
‘‘दापोडी येथील कंत्राटी कामगारांचा प्रश्न हा कामगार आणि त्यांचे कंत्राटदार यांच्यातील मुद्दा आहे. त्याचा कंपनीशी संबंध नाही. हे कामगार कंत्राटदाराच्या वतीने कंपनीत काम करतात. त्यांना इतर कायमस्वरूपी मंडळींप्रमाणे चांगल्या सुविधा व वागणूक दिली जाते. त्यांना कंपनीने काम थांबवण्यास सांगितलेले नाही. या कामगारांनी कोणतीही नोटीस न देता अचानक आंदोलन सुरू केले. याबाबत कंत्राटदाराने न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याचे काय होते याची कंपनी व्यवस्थापन प्रतीक्षा पाहात आहे. या आंदोलनाचा कंपनीच्या उत्पादनावर विशेष परिणाम झालेला नाही,’’ असे हेडेमन यांनी सांगितले.