दुपारी दीडच्या सुमारास ‘१०८’ टोल फ्री क्रमांकावर एका घाबरलेल्या महिलेचा दूरध्वनी आला. त्या महिलेच्या एक वर्षांच्या मुलीला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याबरोबर उलटय़ाही होत असल्यामुळे ती चिमुरडी बेशुद्धच पडण्याच्या मार्गावर होती. महिलेनी सांगितलेला तपशील आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या कॉल सेंटरवर त्वरित टिपून घेण्यात आला. पुढच्या २५ मिनिटांत ‘१०८’ सेवेच्या रुग्णवाहिकेने त्या महिलेच्या घरी पोहोचून तिच्या मुलीला जवळच्या रुग्णालयातही पोहोचवले होते..३-४ दिवसांपूर्वीच पुण्यात घडलेली ही घटना. २१ मार्चला सुरू झालेली ‘१०८’ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुणेकरांसाठी चांगलीच फायदेशीर ठरत असून गेल्या दहाच दिवसांत १५८ नागरिकांचा जीव या सेवेमुळे वाचला आहे.
सध्या जिल्ह्य़ात या सेवेच्या २५ रुग्णवाहिका धावत आहेत. यांपैकी १२ रुग्णवाहिका अद्ययावत जीवरक्षक सेवा देणाऱ्या, तर इतर ‘बेसिक’ जीवरक्षक सेवा पुरवणाऱ्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना या सेवेविषयी माहिती झाल्यास सेवेला असणारा प्रतिसाद आणखी वाढेल अशी अपेक्षा ‘१०८’ सेवेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चौगुले यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘गेल्या १० दिवसांत १५८ रुग्णांना ‘१०८’ सेवेची मदत झाली आहे. या कालावधीत रस्ता अपघातात जखमी झालेल्या ११ जणांना आणि १७ गरोदर महिलांना या सेवेची मदत मिळू शकली. वैद्यकीय स्वरूपाच्या आपत्कालीन स्थितीत असलेल्या ४४ रुग्णांना, तसेच आग, उंचावरून पडणे अशा इतर आपत्कालीन स्थितीत असलेल्या ८६ रुग्णांनाही सेवेचा फायदा झाला.’’
राज्य सरकार, भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लि. आणि यूकेएसएएस (युनायटेड किंग्डम) यांच्यातर्फे ‘१०८’ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची मोफत आपत्कालीन वैद्यकीय सेवा चालवली जाते. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात रुग्णाला पोहोचवणे आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी अद्ययावत उपचार देऊन रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड भागात औंध, निगडी, भोसरी, पिंपरी, मगरपट्टा, कोथरूड, वानवडी, भवानी पेठ, मंगळवार पेठ, धनकवडी, धायरी, वारजे, खराडी, बिबवेवाडी आणि शिवाजीनगर भागात १०८ च्या रुग्णवाहिका धावत आहेत. जिल्ह्य़ात दौंड, कुरकुंभ, निमगाव केतकी, भिगवण, बारामती आणि इंदापूर- हायवे या ठिकाणी सेवा मिळत आहे.
‘१०८’ टोल फ्री सेवेने वाचवला १५८ जणांचा जीव!
२१ मार्चला सुरू झालेली ‘१०८’ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुणेकरांसाठी चांगलीच फायदेशीर ठरत असून गेल्या दहाच दिवसांत १५८ नागरिकांचा जीव या सेवेमुळे वाचला आहे.
First published on: 03-04-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambulance toll free service lifeline