कधीतरी रस्त्यावर, सोसायटीमध्ये साप, जखमी प्राणी-पक्षी आढळतात. मग प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे स्वयंसेवक, प्राणिमित्र यांचा शोध सुरू होतो. प्राणिमित्रांमधील दुवा ठरणारे ‘प्रणिमित्र’ हे अँड्रॉइड अॅप सुरू झाले आहे. वन विभाग, वन्यजीव अभ्यासक आणि सामान्य नागरिक या तिघांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या अॅपवर सापांचे फोटो, वर्णन, त्यांची माहिती मिळू शकते. त्याचबरोबर प्राणिमित्रांचे तपशीलही या अॅपवर मिळू शकतात. आपल्याकडे साप किंवा प्राणी आला, तर या अॅपवर आपला जिल्हा, तालुका, गाव, जवळची खूण असा तपशील द्यायचा आहे. त्यानंतर दिलेल्या पत्त्याच्या सर्वात जवळ असणाऱ्या प्राणिमित्राचा संपर्क क्रमांक या अॅपच्या माध्यमातून मिळेल. या प्राणिमित्राने येऊन प्राणी ताब्यात घेतला, की तो कोणता प्राणी कोणत्या ठिकाणाहून ताब्यात घेतला त्याची माहिती या अॅपवर देईल. ती माहिती मिळेल वनविभागाला. त्यामुळे प्राणिमित्रांवर नियंत्रण ठेवणे वनविभागालाही सोपे जाणार आहे. त्यामुळे पकडलेल्या प्राण्याचे पुढे काय झाले, त्यावर काय उपचार केले, त्या प्राण्याला निसर्गात सोडले का, कोणत्या भागात सोडले अशा सर्व बाबींवर वनविभाग लक्ष ठेवू शकणार आहे.
ज्या ठिकाणी प्राणी पकडला, त्या ठिकाणचे वातावरण कसे होते, कोणत्या जातीचा प्राणी होता अशी माहितीही या अॅपच्या माध्यमातून संकलित होणार आहे. त्यामुळे कोणत्या भागात कोणते प्राणी सर्वाधिक सापडत आहेत, त्याच्यामध्ये काही फरक आढळत आहे का याचा अभ्यास करण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांसाठीही हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्राणिमित्रांची माहिती या अॅपसाठी संकलित करण्यात येत असून सध्या पुण्यासाठी हे अॅप सुरू करण्यात आले आहे.