पिंपरी पालिकेच्या कासारवाडी-नाशिकफाटा दुमजली उड्डाणपुलाला ‘भारतरत्न जेआरडी टाटा’ असे नाव देण्यात आले असताना त्यात ‘भारतरत्न’ हा शब्द लिहायचे राहून गेल्याची चूक पालिकेने बुधवारी सुधारली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (१५ फेब्रुवारी) पुलाचे उद्घाटन होणार आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्यातून तसेच केंद्र सरकारच्या निधीतून पिंपरी पालिकेच्या वतीने १३० कोटी खर्चाचा उड्डाणपूल कासारवाडी येथे उभारण्यात आला आहे. त्यास टाटा यांचे नाव देण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या दर्शनी भागावर टाटा यांचे नाव लिहिताना ‘भारतरत्न’ शब्द टाकायचे राहून गेले होते. ही चूक प्रशासनाच्या उशिराने लक्षात आली. त्यानंतर घाईने ही दुरुस्ती करण्यात आली. या नामकरण समारंभासाठी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेतही ‘भारतरत्न’ हा उल्लेख राहिला होता. मात्र, त्यातही सुधारणा करण्यात आली.

Story img Loader