एखाद्या वाहन कंपनीच्या प्रशस्त दालनात रांगेने ठेवलेल्या मोटारी आपण पाहिल्या असतील, तशाच पद्धतीने एखाद्या विवाह सोहळ्यात नवी कोरी वाहने लावण्यात आली असतील तर.. रावेत येथे रविवारी झालेल्या एका आलिशान विवाह सोहळ्यात असे चित्र दिसले. या सोहळ्याची पिंपरी-चिंचवड आणि मावळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
एक ऑडी, एक फॉर्च्युनर, १२ बुलेट अशी वाहने जावई सन्मान म्हणून देण्यात आल्या. ओवाळणी करणाऱ्या आत्यासाठी अॅक्टिव्हा आणि इतर पै पाहुण्यांसाठी सोन्याच्या अंगठय़ा देण्यात आल्या.
चिंचवड परिसरातील एक बडे घराणे आणि मावळातील एका दिलदार व हौशी इसमाचे तालेवार घराणे यांच्यात नातेसंबंध जोडणारा हा विवाह सोहळा महामार्गालगतच्या एका प्रशस्त मंगल कार्यालयात पार पडला. पै-पाहुण्यांची मोठी उपस्थिती असलेल्या या सोहळ्यासाठी दूरदूरवरून नातेवाईक आले होते. येथील प्रथेप्रमाणे तास-दीड तास उशिराने विवाह लागला. आमदार-खासदार व परिसरातील दिग्गज मंडळींची या वेळी आवर्जून उपस्थिती होती. जावई सन्मान म्हणून इतर सोपस्कार पार पडलेच, शिवाय जावयास एक ऑडी देण्यात आली. अन्य एका जावयास फॉर्च्युनर देण्यात आली. भावकीतील इतर जावयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १२ बुलेट देण्यात आल्या. इतर पाहुणे मंडळींचा असाच तोलामोलात मान-सन्मान करण्यात आला.

Story img Loader