राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये गेलेले आझम पानसरे लोकसभेच्या प्रचारापासून अलिप्त होते. मात्र, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मावळचे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यासाठी पानसरेंना दूरध्वनी केल्यानंतर ते सक्रिय झाल्याचे सांगण्यात येते. पवारांच्या सांगवीतील सभेत त्यांनी हजेरी लावली, तर निगडीत हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाषण करून मनातील ‘खदखद’ही बोलून दाखवली. त्यांच्या सक्रिय होण्यामुळे मावळच्या लढतीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला पानसरे वैतागले होते. लक्ष्मण जगताप यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारलीच नाही. या नाटय़मय घडामोडीनंतर नार्वेकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. पानसरे सुरुवातीपासून चार हात लांब होते. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बैठकांना येत नव्हते. संयुक्त बैठकांना येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आपल्याला पराभूत करणाऱ्या जगतापांचा वचपा काढण्याचे पानसरेंच्या डोक्यात आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करू शकेल, अशाच उमेदवाराला मदत करण्याची त्यांची भूमिका असून तशी त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे.
मात्र, पानसरेंनी आघाडीचे काम करावे, त्यांच्या ताकदीचा राष्ट्रवादीसाठी उपयोग व्हावा, यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना केली. त्यानुसार, पवार यांनी वैयक्तिक संपर्क साधून पानसरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, मंगळवारी ते शरद पवार यांच्यासमवेत सांगवीच्या सभेला उपस्थित राहिले. दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत निगडीतील बैठकीतही हजर राहिले. यावेळी अन्य वक्तयांनी आघाडी धर्माची भाषा सुरू केली. तेव्हा पानसरेंनी उत्तर दिले. मला पराभूत करण्यात ज्यांचा हात होता, त्यांनाच उमेदवारी देणार होते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. सांगवीतील सभेत खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला. आपल्यावेळी आघाडी धर्म कुठे होता, तेव्हा त्याचे पालन झाले असते तर आजची वेळ आली नसती, अशी सल त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यामुळे, उर्वरित दिवसात पानसरे आघाडी धर्माचे पालन करतात की पूर्वनियोजित कार्यक्रम पार पाडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे आहे.

Story img Loader