पिंपरी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ‘तारांगण’ उभारण्यात येणार असून भोसरी एमआयडीसीच्या १५ एकर जागेत ‘बालनगरी’ विकसित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन शुक्रवारी होणार आहे.
चिंचवडच्या सायन्स पार्क परिसरात उभारण्यात येणाऱ्या तारांगणासाठी १५ कोटी खर्च होणार आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असणाऱ्या तारांगणात १५० बैठक व्यवस्था असून १०० बैठक व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह आहे. याशिवाय, पुस्तक दालनाचेही नियोजन आहे. हे तारांगण १५.० मीटर व्यासाचे व गोलाकार असून त्याचा सांगाडा लोखंडी आहे. त्यावर आधुनिक काचेचे आवरण बसवण्यात येणार आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या समितीने केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसीच्या १५ एकर जागेत बालनगरी विकसित करण्यात येणार असून त्यासाठी २५ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या बालनगरीत लहान मुलांना प्रत्यक्ष जीवनातील वेगवेगळ्या विषयांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, वेगवेगळे खेळही खेळता येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुक्त नाटय़गृहासह विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Story img Loader